होमगार्डच्या भरतीत जिल्ह्याच्या उमेदवारांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 07:02 PM2019-03-06T19:02:21+5:302019-03-06T19:03:15+5:30
या भरतीत गैरशिस्त, अफरातफर, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असणाऱ्यांना प्रवेश नसेल. या भरतीत नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात गृहरक्षक दल अर्थात होमगार्डची मेगा भरती करण्यात येणार असून, पोलिस भरतीच्या धर्तीवरच २९ मार्च रोजी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदान व ग्रामीण पोलीस आडगांव येथे या भरतीची प्रक्रिीया सुरू करण्यात येणार आहे. या भरतीत गैरशिस्त, अफरातफर, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असणाऱ्यांना प्रवेश नसेल. या भरतीत नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली आहे.
होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया २९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार असून, पुरुष उमेदवारांसाठी पात्रता निकष वय २० ते ५० वर्ष इतके असेल व दहावी उत्तीर्ण असावे लागेल. उंची १६२ से.मी. तसेच छाती न फुगवता ७६ सें.मी व फुगवुन ८१ से.मी. असणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी पुरूषांसारखेच निकष असतील परंतु उंची १५० से.मी. असणे आवश्यक आहे. या अटी व शर्ती पुर्ण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह व छायांकित प्रतीसह स्वखचार्ने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असावा. शारिरीक विकलांगता असलेले उमेदवार तसेच यापुर्वी संघटनेत असलेले परंतु गैरशिस्त, अफरातफर, न्यायालयीन प्रकरणी दोषी असलेले होमगार्डस नोंदणीसाठी अपात्र ठरविण्यात येतील. भरतीसाठी उमेदवार नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक असून रहिवासी पुराव्याकरिता आधार कार्ड, मतदान कार्ड व शिधापत्रिका व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा मुळ दाखला सोबत आणणे अनिवार्य असून, एक फोटो आयडी पुरावा व उमेदवाराचे नजीकच्या काळातील चार पासपोर्ट साईज फोटो जोडावेत. महिला उमेदवारांनी वडीलांचे, पतीचे, कुंटुंब प्रमुखांचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे. तसेच एनसीसी, माजी सैनिक, खेळाडू , आयटीआय, जडवाहन चालक, नागरी संरक्षण सेवेत तीन प्रशिक्षण पुर्ण केलेले उमेदवारांनी त्यासंदभार्तील मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सदस्य नोंदणी करिता आलेल्या उमेदवारांना २९ मार्च रोजी सकाळी ८ वाजेनंतर सदस्य नोंदणी प्रक्रियेत प्रवेश देता येणार नसल्याचे अपर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड वालावलकर यांनी कळविले आहे.