कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 19:08 IST2025-03-23T19:08:21+5:302025-03-23T19:08:40+5:30

नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Priority given to industrial and sustainable development of the state through efficient administration Chief Minister Devendra Fadnavis | कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: विकासाची प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागापुरती  मर्यादित न ठेवता राज्याच्या सर्वांगीण विकासाला  प्राधान्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच नव उद्योजकांपुढे मांडला. कॉन्फडेरेशन ऑफ़ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यंग इंडियन्‍सच्‍या नाशिक शाखेतर्फे पश्‍चिम क्षेत्र परिषदेने आयोजित संवादात नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

सीआयआय यंग इंडियन्‍सच्‍या नाशिक शाखेतर्फे पश्‍चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज मुख्यमंत्र फडणवीस यांच्या संवादाने झाला.  
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आणि त्याचबरोबर राज्याच्या विकासाची दिशाही स्पष्ट केली. कार्यक्षम प्रशासन, निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे विकास प्रक्रियेला गती दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी कुंभमेळा, त्याअनुषंगाने होणारी विकासकामे याबाबतही त्यांनी नाशिकरांना आश्वस्त केले.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये औद्योगिक  विकासाची मोठी क्षमता आहे. येथील मनुष्यबळ आणि हवामान लक्षात घेता पर्यटन आणि औद्योगिक विकासाला भरपूर वाव आहे. एचएएलमुळे डिफेन्स इकोसिस्टम इथे आहे. मुंबईचा फायदा पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरांना झाला. समृद्धी महामार्गामुळे आता नाशिकचा अधिकगतीने विकास होणार आहे.  देशातील सर्वात मोठे बंदर आता वाढवण येथे होत आहे. नाशिक येथून वाढवणसाठी ग्रीनफिल्ड रोड तयार करणार असल्याने त्याचा खूप मोठा फायदा नाशिक शहराला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरावर भर

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली.  दळणवळण सुविधांचा विकास झाल्यास  त्याचा लाभ नाशिकला होईल. एआय तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो, याकडे अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुगल बरोबर भागीदारी करून सेंटर ऑफ एक्सलन्स बाबत काम सुरू केले आहे. कृषी, कायदा क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने नव्या रोजगार आणि उद्योग संधी निर्माण होत आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करून नवे अभ्यासक्रम  विकसित करण्यात येत आहेत. रतन टाटा स्कील युनिव्हर्सिटीने याबाबत दहा हजार महिलांना प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागातील उद्योजकांना अधिक वाव देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
 
नाशिकमध्ये शेती प्रक्रिया उद्योगाचे उत्तम मॉडेल

उद्योगासोबतच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे.  नाशिकची ओळख प्रगत शेतीसाठी आहे.  जिल्हा द्राक्षे, कांदे, भाजीपाला उत्पादनत आघाडीवर आहेत. कृषी क्षेत्रात मूल्यवर्धित साखळी नाशिकने विकसित केली असून हे नाशिक मॉडेल आहे. याशिवाय, सह्याद्री ॲग्रोने प्रक्रिया उद्योगाचे मॉडेल अतिशय चांगल्या पद्धतीने राबविले आहे.

राज्याने स्मार्ट योजना, ॲग्री बिझनेस योजना सुरू केली. बाजारपेठ व्यवस्थेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी काम सुरू केले. केंद्रीय योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून २० लाख घरे उभारण्यात येत आहे. त्याचा लाभ विविध माध्यमातून ग्रामीण भागाला होत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्याची १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी रोडमॅप तयार

भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करत आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची १ ट्रिलियन अर्थव्यवस्था २०२९ मधेच होईल यासाठी रोडमॅप तयार आहे. आर्थिक विकासासाठी दळणवळणाची गती महत्वाची आहे.  पायाभूत सुविधाही महत्वाच्या आहेत. त्यादृष्टीनेच समृद्धी महामार्ग तयार झाला आहे. शक्तिपीठ महामार्गही तयार करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्रात गुंतवणूकसाठी अनुकूल वातावरण, सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात

देशात विकासाच्या बाबतीत स्पर्धात्मक वातावरण आहे. दहा-बारा राज्ये  उद्योग आणि आर्थिक विकासात चांगले काम करत आहेत. महाराष्ट्र यात आघाडीवर आहे.  कारण येथे गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण आहे. देशात येणारी सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. ही गुंतवणूक केवळ महानगर क्षेत्रात नव्हे, तर राज्यात सर्वत्र व्हावी यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. त्याला यश मिळत आहे. मुंबई, पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली सारख्या जिल्ह्यातही गुंतवणूक होत आहे.  पहिल्या तीन तिमाही अहवालात औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र ‘मॉडेल ऑफ गव्हर्नन्स’ आहे. ज्या इतर राज्यात काही चांगल्या कल्पना आहेत, त्याचीही अंमलबजावणी राज्यात करत आहोत. राज्यात शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

Web Title: Priority given to industrial and sustainable development of the state through efficient administration Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.