कैद्यांच्या रोजगारातून कारागृहाला मिळाले सव्वादोन कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:03+5:302021-07-15T04:12:03+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाची संपूर्ण जागा एकशे दोन एकर आहे. त्यामध्ये खुल्या कारागृहाची ४५ एकर शेती असून, मध्यवर्ती कारागृहात पाच ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाची संपूर्ण जागा एकशे दोन एकर आहे. त्यामध्ये खुल्या कारागृहाची ४५ एकर शेती असून, मध्यवर्ती कारागृहात पाच एकर शेती आहे. तसेच कारागृहाच्या मागील जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून, बांबू, आंबा, आवळा यांची बाग बनवण्यात आली आहे. जनावरांसाठी मोठा गोठा असून, तसेच कारागृहाची वास्तू, कैद्यांची राहण्याची सोय याव्यतिरिक्त काही जागा पडीक स्वरूपात आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कोरोनापूर्वी गेल्या मार्च महिन्यात जवळपास ३६०० हून अधिक कैदी होते. तेराशेहून अधिक कैद्यांना वर्षभरामध्ये कोरोना पॅरोल व जामिनावर सोडण्यात आले आहे. आजच्या मितीला कारागृहामध्ये २३०० कैदी आहेत. कैदी पॅरोल सुट्टीवर गेल्याने गेल्या वर्षभरापासून कारागृह मागील खुल्या कारागृहाची ४५ एकर शेती बंद झाली आहे. यापूर्वी त्या शेतीवर ८० ते १०० कैदी शेतीकाम करत होते. मात्र आता मध्यवर्ती कारागृहातील पाच एकर शेतीवर पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, आंबटचुका, राजगिरा, तांदूळका, मुळा, करडई, कांदापात, वांगे, चवळी, भेंडी, दुधी भोपळा, डांगर आदी पालेभाज्या लावण्यात आल्या आहेत.
-------
काय काय बनविले जाते?
* लोहार विभागाकडून पोलिसांच्या पेट्या, वसतिगृहासाठी पलंग, पोलीस प्रोटेक्शन जाळी, वसतिगृह, शाळेचे कपाट आदी विविध वस्तू बनविल्या जातात.
* सुतार विभागाकडून खुर्च्या, टेबल, डायनिंग टेबल, देव्हारे, फर्निचर शोभेच्या लाकडी वस्तू बनविल्या जातात.
* मूर्ती विभागात मातीच्या विविध मूर्ती, फायबरच्या मूर्ती, शोभेच्या मूर्ती बनवल्या जातात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपतीच्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या जातात.
* विणकाम विभागामध्ये पंजादरी लुंबचीदरी, कारपेट, मोठ्या सतरंज्या बनवून दिल्या जातात.
* शिवणकाम विभागाकडून पडदे, साड्या, पैठणी, कापडी मास्क, टॉवेल, बेडशीट, कैद्यांचे कपडे शिवले जातात.
-------------
कोरोनाकाळात सव्वादोन कोटींचे काम
कारागृहात शेतीतून निघणारे उत्पादन व बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तू यांचा वापर प्राधान्याने कारागृहासाठी केला जातो. त्यानंतर शासकीय कार्यालय, न्यायालय, देवालय, वसतिगृह, शाळा त्यांच्यासाठी प्रामुख्याने काम केले जाते. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रगती केंद्रामध्येदेखील विविध वस्तू सर्वसामान्यांना विक्रीसाठी ठेवल्या जातात. गेल्या आर्थिक वर्षाअखेर कारागृहाला शेती व इतर ९ कारखाना विभागाकडून जवळपास सव्वादोन कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ३१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
--------------
पॅरोल नको रे बाबा !
* कोरोना पॅरोल व कोरोना जामीन हा जवळपास बहुतांश कैद्यांनी स्वीकारून ते कारागृहातून बाहेर गेले आहेत. * चार-पाच कैद्यांची शिक्षा ही अवघी काही महिने राहिल्याने त्यांनी कोरोना पॅरोलची सुट्टी न घेता सर्व शिक्षा पूर्ण करूनच जाण्याचा निर्णय घेतल्याने ते कैदी कारागृहात आहेत.
-----
कारागृहात गेल्यावर्षी ३६०० हून अधिक कैदी होते. मात्र कोरोना सुट्टीमुळे १३०० हून अधिक कैदी सुट्टीवर गेल्याने खुल्या कारागृहाच्या ४५ एकर शेतीचे काम वर्षभरापासून बंद आहे. तसेच विविध कारखान्यांचे कामदेखील कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. कारागृहात तयार होणाऱ्या वस्तूंना मोठी मागणी असते. कैदी सुट्टीवर गेले असले तरी इतर कैद्यांच्या मदतीने सर्व कारखान्यांतील काम सुरू ठेवले आहे.
-प्रमोद वाघ
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड