धनादेश न वटल्याने कारावासाची शिक्षा
By Admin | Published: June 2, 2016 11:40 PM2016-06-02T23:40:41+5:302016-06-03T00:23:25+5:30
कळवण : सप्तशृंगी महिला पतसंस्थेच्या कर्जदारावर कारवाई
कळवण : येथील सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सप्तशृंगगड शाखेच्या कर्जदार परिघा नवनाथ बेनके यांनी वेळेवर कर्जफेड न केल्याने व कर्जापोटी त्यांचे पती नवनाथ रामचंद्र बेनके यांनी दिलेला धनादेश न वटल्याने त्यांच्याविरुद्ध कळवण न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने बेनके यांना एक वर्षाची शिक्षा व चार लाख २० हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पतसंस्थेने वेळोवेळी थकित कर्ज भरण्यासाठी वसुलीचा तगादा लावत नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र परिघा बेनके यांनी कर्ज भरण्याबाबत टाळाटाळ केली. त्यांचे पती बेनके यांनी कर्जवसुलीसाठी पतसंस्थेला धनादेश दिला होता. मात्र तो वटला नाही म्हणून पतसंस्थेने बेनके यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे नोटीस व समन्स दिले होते.
यावर कळवण न्यायालयात सुनावणी होऊन धनादेशधारक यांना या शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवून एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि चार लाख २० हजार इतक्या द्रव्यदंडाची रक्कम न्यायालयात जमा करावी, रक्कम जमा न केल्यास आणखी तीन महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी, असा निकाल कळवण न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. पैठणकर यांनी दिला आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने अॅड. वाघ यांनी काम पाहिले. (वार्ताहर)