कारागृहातील कैद्यांचे हात ‘विघ्नहर्त्या’च्या सजावटीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:12 AM2021-07-11T04:12:01+5:302021-07-11T04:12:01+5:30

नाशिकरोड : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या चार महिन्यांपासून घरगुती पर्यावरणपूरक गणपती मूर्ती ...

Prisoners' hands are busy decorating the 'disruptor' | कारागृहातील कैद्यांचे हात ‘विघ्नहर्त्या’च्या सजावटीत व्यस्त

कारागृहातील कैद्यांचे हात ‘विघ्नहर्त्या’च्या सजावटीत व्यस्त

Next

नाशिकरोड : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या चार महिन्यांपासून घरगुती पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामामध्ये कलाकार कैद्यांनी झोकून दिले आहे. सध्या कारागृहात सुमारे पाचशे पर्यावरणपूरक एक ते दोन फुटाच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मूर्तीला रंगरंगोटी व सजावट करण्यात येत आहे.

यंदादेखील कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. घरगुतीसाठी दोन फूट सार्वजनिक मंडळासाठी चार फुटाची मूर्ती स्थापित करता येणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे मोठ्या मूर्ती, चलत देखावे, आरास, भव्यदिव्य मंडप, मिरवणूक अशा सर्वांवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कारागृह प्रशासनाकडून, कैद्यांकडून विविध प्रकारची कामे केली जातात. कारागीर व कलाकार कैद्यांना त्यांच्या हौसेनुसार काम दिले जाते. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह सध्या सुतार, शिवण, लोहार, चर्मकला, विणकाम, बेकरी, रसायन विभाग, मूर्तिकला, धोबी विभाग असे नऊ कारखाने आहेत. कारखान्यात बनविलेल्या वस्तू या कारागृहाच्या प्रवेशद्वारावर केंद्रांमधून विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामधून कैद्यांना उत्पन्नदेखील मिळते.

------

५०० मूर्ती तयार

कारागृहात गेल्या चार वर्षांपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांकडून पर्यावरणपूरक मूर्ती बनवून त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. पहिली तीन वर्षे कारागृहात बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मोठी मागणी होती. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशमूर्ती कमी प्रमाणात बनवण्यात आल्या होत्या. यावर्षीदेखील कोरोनाचे सावट असले तरी शासनाच्या नियमानुसार घरोघरी बसवण्यासाठी एक ते दोन फूट उंचीच्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यात येत आहेत. जवळपास पाचशे मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यात कमल गणेश, वक्रतुंड गणेश, आसन गणेश, लंबोदर गणेश, उंदीरस्वार गणेश, कार्तिक मोर गणेश, टिटवाळा गणेश, लालबाग राजा गणेश, लंबोदर गणेश, गजमुख गणेश अशी अकरा विविध प्रकारची गणेशची रूपे आहेत. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती विभागाचे व्यवस्थापक एस. ए. गिते, प्रशांत पाटील, अभिजित कोळी, भगवान महाले हे गेल्या चार महिन्यांपासून शाडूमाती, पर्यावरणपूरक रंग व इतर साहित्य उपलब्ध करून देत कैद्यांकडून मूर्ती बनवून घेत आहेत.

------

मूर्ती साकारणारे कैदी बांधव

कैदी फुलाराम नवराम मेघवाल, अशोक गंगाराम घरट, विकास विठ्ठल घुरुप, महेंद्र मिट्टू भिल तेरवा, बापू लक्ष्मण साळुंखे, वजीर नानासिंग बादेला, रोहिदास सरभिर खुटारे, शंकर मदन झरे हे कैदी गेल्या चार महिन्यांपासून गणरायाच्या मूर्ती साकारत आहेत.

---------

कारागृहाच्या उत्पन्नात भर

कारागृहात या पहिल्या वर्षी १३८ मूर्तींची विक्री करून १ लाख २२ हजार उत्पन्न मिळविले होते. दुसऱ्या वर्षी ११३४ मूर्ती विक्री करून सुमारे १३ लाख, तिसऱ्या वर्षी ६६८ मूर्ती विक्री करून ११ लाख ३६ हजार उत्पन्न मिळवले होते. गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे ४८६ मूर्ती विक्री करून सात लाख ३५ हजार रुपये उत्पन्न मिळविले होते.

(फोटो १० गणेश)

Web Title: Prisoners' hands are busy decorating the 'disruptor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.