पृथ्वीराच चव्हाण : गोदाकाठ सरस ‘रत्नां’ची खाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:18 PM2018-08-13T22:18:18+5:302018-08-13T22:19:51+5:30
नाशिक : साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख असली तरी येथील गोदाकाठावरून राज्याला सातत्याने विविध रत्ने मिळाली आहेत. गोदाकाठावर ‘रत्नां’ची खाण आहे. राज्यासाठी अन् देशासाठी प्रतिनिधित्व करण्यासारखी रत्ने संभाव्य काळातही नाशिकनगरीत मोठ्या संख्येने विकसित होतील, असे अनुकूल वातावरण येथे आहे यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सुविचार मंच या संस्थेच्या वतीने सोमवारी (दि.१३) रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित ‘सुविचार गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे यांच्यासह पुरस्कारार्थींमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले, यशोशिखर सर करण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. त्यामुळे जीवनात ठरविलेले ध्येय साध्य करताना येणाऱ्या संकटांमुळे खचून जाऊ नये. जिद्दीने त्यावर मात करावी आणि आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले.
दरम्यान, विनायकदादा यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले, समाजातून प्रेरणादायी कर्तृत्वान माणसे हेरणे आणि त्यांची पुन्हा समाजापुढे पेरणी करणे हे अत्यंत अवघड असे काम आहे, हे काम ही संस्था लीलया पार पाडत असून ही अत्यंंत कौतुकास्पद बाब आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व्यक्तींना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक अॅड. रवींद्र पगार यांनी केले. सूत्रसंचालन आकाश पगार यांनी केले.
असे आहेत पुरस्कारार्थी
माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेता स्वप्नील जोशी, अभिजित खांडकेकर, डॉ. रवींद्र सपकाळ, डॉ. आशुतोष साहू, दीपक बागड, डॉ. विनोद गोरवाडकर, क्रिकेटपटू माया सोनवणे, विश्वास ठाकूर यांनाही ‘सुविचार गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
द्राक्ष-रुद्राक्षाची संस्कृती लाभलेल्या शहरात एका सामाजिक संस्थेकडून बहुमान मिळणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. नाशिकचे पाणी अन् मातीत वेगळाच कस आहे. मराठी चित्रपटसृष्टीला ‘अच्छे दिन’ प्रेक्षकांमुळेच आले आहेत.
- स्वप्नील जोशी, अभिनेता
--