येवल्यात खासगी रुग्णवाहिका चालकांचा संप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 10:52 PM2021-09-07T22:52:36+5:302021-09-07T22:56:17+5:30
येवला : जनसेवा रुग्णवाहिका सेवा संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकही संपात सहभागी झाले आहेत.
येवला : जनसेवा रुग्णवाहिका सेवा संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकही संपात सहभागी झाले आहेत.
तहसीलदार प्रमोद हिले यांना खासगी रुग्णवाहिका चालकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. नाशिक शहरात बी साइड यू या कंपनीमार्फत रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे नाशिक शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकांना मोठा फटका बसला आहे.
सदर कंपनीची सेवा जिल्हाभरात प्रस्तावित आहे. भविष्यात असे झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ येईल, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
नाशिक शहरात जनसेवा रुग्णवाहिका सेवा संस्थेच्या वतीने सर्व खासगी रुग्णवाहिका चालक-मालक यांच्या वतीने बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. त्यास पाठिंबा म्हणून तालुक्यातील रुग्णवाहिका चालक-मालक संघटनाही सदर संपात सहभागी आहे. खासगी रुग्णवाहिका चालकांच्या हितासाठी यात हस्तक्षेप करावा, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकांच्या संपामुळे सकाळपासून सर्व प्रकारची रुग्णसेवा थांबली आहे. परिणामी, काही प्रमाणात खासगी रुग्णालयातील रुग्णांचे रुग्णवाहिकांअभावी हाल झाल्याचे दिसून आले.