विक्रेत्यांना खासगी जागांचा आधार
By Admin | Published: September 8, 2015 11:40 PM2015-09-08T23:40:47+5:302015-09-08T23:41:43+5:30
गणेशमूर्ती विक्रीचा पेच : मालकांचा पुढाकार; मनपाकडूनही जागांचा शोध
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही पर्वणीमुळे यंदा नेहमीच्या ठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांना गाळे उपलब्ध करून देण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविल्यानंतर विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी जागामालक पुढे सरसावले असून, त्यांनीही त्यानिमित्त व्यवसायाची पर्वणी साधली आहे. दरम्यान, महापालिकेनेही विभागीय कार्यालयांमार्फत जागांचा अहवाल मागविला असून, प्रमुख रस्त्यांवर जागा उपलब्ध होणे दुरापास्त आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील द्वितीय पर्वणी १३ सप्टेंबर आणि तृतीय १८ सप्टेंबर रोजी आहे. दि. १७ सप्टेंबरला गणेश प्रतिष्ठापना होणार असल्याने त्यापूर्वी शहरात सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी भाविक मार्गांवर कोणतेही अडथळे येणार नाही, याची दक्षता घेतली आहे. परिणामी, महापालिकेने यंदा प्रमुख रस्त्यांलगत गणेशमूर्तीसाठी विक्रेत्यांना गाळे उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचा विरोध डावलून व्यावसायिकांकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर गणेशमूर्ती विक्रीसाठी गाळे उभारले जात आहेत. मात्र, यंदा सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे गाळे उभारता येणार नसल्याने मोक्याच्या जागांचा शोध विक्रेत्यांकडून घेतला जात आहे. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने विक्रेत्यांकडून मिळेल त्या खासगीजागांवर गाळे उभारणी केली जात असून, विक्रेत्यांची निकड लक्षात घेता काही खासगी जागामालकांनीही आपले मोकळे भूखंड गाळे उभारणीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी शहरात जाहिरातीही झळकत आहेत. प्रामुख्याने मुंबई नाक्यावरील हॉटेल किनारालगत खासगी जागेत सुमारे ७० गाळे उभारण्यात आले असून, त्यांचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले, तर गंगापूररोडवर खतीब डेअरीसमोर तसेच श्रद्धा पेट्रोलपंपाजवळील जागेतही गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे खासगी जागामालकांनाही व्यवसायाची संधी चालून आली आहे. यंदा गणेशमूर्ती खरेदीसाठी नाशिककरांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागणार आहे. दरम्यान, शहरातील काही खासगी जागांवर तसेच दुकानांमध्ये गणेशमूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या असून, मूर्ती आरक्षित करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली
आहे. (प्रतिनिधी)