नाशकात खासगी कोचिंग क्लासेसही ३१ मार्चपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 09:26 PM2020-03-15T21:26:31+5:302020-03-15T21:28:50+5:30
नाशिकमधील खासगी क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व क्लासेस सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित नसलेल्या पदाधिकारी व सभासदांना या निर्णयाविषयी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्व शाळा व खासगी क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, नाशिक शहरासह जिल्हाभरातील खासगी क्लासेसच्या संचालकांनी शासनाच्या आदेशाला प्रतिसाद देत सर्व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमधील खासगी क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१४) झालेल्या बैठकीत सर्व क्लासेस सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित नसलेल्या पदाधिकारी व सभासदांना या निर्णयाविषयी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व शाळांसह कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे क्लासेसचालकांनी क्लासेस बंद ठेण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व शिक्षकांनी मोबाइल किंवा इंटरनेटचा वापर करून विद्यार्थ्यांना गरजेनुसार मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष मुकुंद रणाळकर, राज्य मंत्रालयीन समिती प्रमुख यशवंत बोरसे, उपाध्यक्ष अरुण कुशारे, कार्याध्यक्ष वाल्मीक सानप, शिवाजी कांडेकर, सरचिटणीस लोकेश पारख आदी उपस्थित होते. कोरोनामुळे सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेताच नाशिक जिल्हा खासगी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने तत्काळ बैठक घेऊन ३१ मार्चपर्यंत कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बैठकीला संघटनेने १५ ते २० सदस्य उपस्थित असले तरी अन्य सदस्यांना सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सूचित करण्यात आल्याची माहिती कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली.
खासगी कोचिंग क्लासेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला असला तरी परिस्थिती सुधारली तर सामूहिक चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बंदी उठल्यानंतर अतिरिक्त तासिका घेण्याचे नियोजन असल्याचे सरचिटणीस लोकेश पारख यांनी सांगितले.