सुरक्षिततेची साधने नसल्याने खासगी रुग्णालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:48 PM2020-03-30T16:48:24+5:302020-03-30T16:50:13+5:30
विशेष म्हणजे एन-९५ मास्कचा नाशिकमध्ये काळाबाजार सुरूच असून, दोनशे ते अडीचशे रुपये मोजूनही मास्क मिळत नाही, त्यामुळे दवाखाने कसे काय सुरू ठेवणार? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक अगतिक झाले असतानाच शहरात नव्हे तर राज्यात अनेक खासगी रुग्णालये आणि दवाखाने बंद झाले आहेत. शासन आणि प्रशासन याबाबत वैद्यकीय व्यावसायिकांना कारवाईचे इशारे देत असले तरी सद्यस्थितीत आवश्यक असलेली पीपीइ म्हणजे प्रायव्हेट प्रोटेक्शन इक्युपमेंट उपलब्ध होत नसल्याने रुग्णालये बंद ठेवण्याची वेळ आल्याचे वैद्यकीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे एन-९५ मास्कचा नाशिकमध्ये काळाबाजार सुरूच असून, दोनशे ते अडीचशे रुपये मोजूनही मास्क मिळत नाही, त्यामुळे दवाखाने कसे काय सुरू ठेवणार? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग वाढल्यापासून राज्य शासनाने विशेष दक्षता घेताना नियमित ओपीडी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याचबरोबर अनेक दवाखाने आणि रुग्णालये बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मनपा आणि अन्य शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढल्याने मध्यंतरी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली होती. मात्र, या संदर्भात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या वेगळ्याच अडचणी पुढे आल्या आहेत.
नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात बहुतांशी रुग्णालयात आणि वैद्यकीय व्यावसायिकांकडे प्राप्त परिस्थितीत सुरक्षित वैद्यकीय उपकरणे नाहीत. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफला एन-९५ मास्क, जंतू संसर्गापासून सुरक्षित असणारे गाउन्स आणि हॅण्ड ग्लोज, हॅण्ड सॅनिटायझर नाहीत. नाशिकच्या बाजारात तर एरव्ही-१३० रुपयांचा असणारा एन-९५ मास्क २०० ते २५० रुपयांना आहे, पण तरीही तो उपलब्ध होत नाही. या संदर्भात शासनाने काळाबाजार रोखून अतिरिक्त मास्क तसेच सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याचे आदेश कुचकामी ठरले आहेत. कोणताही रुग्ण आल्यानंतर तो कोरोनाचाच रुग्ण आहेत हे तपासणी शिवाय कळणार नाही, पण असा एकदा रुग्ण आला तर त्याच्यापासून बचावण्यासाठी म्हणजेच जंतू संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधने नाहीत केवळ डॉक्टर नव्हे तर त्यांच्याकडील पॅरा मेडिकल स्टाफसाठीसुद्धा कोणत्याही प्रकारची साधने नसतील तर दवाखाने कशी काय सुरू ठेवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.