खासगी रुग्णालये बंद, महापालिकेवर ताण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:35 PM2020-03-25T23:35:51+5:302020-03-25T23:36:54+5:30
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले असले तरी रुग्णालये आणि दवाखाने सुरूच राहणार आहेत. मात्र असे असताना अनेक रुग्णालये बुधवारी बंद करण्यात आली असून, थेट महापालिकेच्या रुग्णालयात किंवा सिव्हिलमध्ये रुग्णांना पाठवले जात आहे. परंतु यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन केले आहे.
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले असले तरी रुग्णालये आणि दवाखाने सुरूच राहणार आहेत. मात्र असे असताना अनेक रुग्णालये बुधवारी बंद करण्यात आली असून, थेट महापालिकेच्या रुग्णालयात किंवा सिव्हिलमध्ये रुग्णांना पाठवले जात आहे. परंतु यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन केले आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खासगी उद्योग व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले आहे. शासकीय कार्यालयातदेखील अवघे पाच टक्के कर्मचारीच उपस्थित राहात आहेत. असे असले तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. त्यात सर्व प्रकारची रुग्णालये आणि दवाखान्यांचा तसेच औषधालये, पेट्रोलपंप, खाद्य पार्सल सेवा, किराणा दुकाने यांचा समावेश आहे. भाजीबाजार आणि दूध विक्रीचीदेखील सुविधा आहे. मात्र, वैद्यकीय व्यवसायाची गरज असतानादेखील शहरातील अनेक रुग्णालये आणि दवाखाने बंद झाले असून, त्याठिकाणी रुग्ण गेल्यास महापालिकेच्या रुग्णालयात किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवित आहेत, असा फिडबॅक प्राप्त झाल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे म्हणणे आहे.
मुळात जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना संशयित दाखल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील रुग्ण दाखल केले जात आहेत.
कोरोना प्रतिबंध हे सर्वाधिक महत्त्वाचे काम जिल्हा शासकीय रुग्णालये आणि महापालिकेच्या रुग्णालयात प्राधान्य असताना अशाप्रकारे खासगी रुग्णालयातील रुग्ण तेथे पाठवून अकारण ताण निर्माण केला जात असल्याने अशाप्रकारे रुग्ण पाठवू नये, असे गमे यांनी आवाहन केले आहे.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांची रुग्णालये सुरू ठेवून सेवा देणे आवश्यक आहे. संचारबंदी काळातील त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलिसांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारे कामावर जाता येईल. मात्र अकारण सेवा बंद ठेवून कोणीही अडवणूक करू नये.
- राधाकृष्ण गमे, आयुक्त