शासकीयसह खासगी रुग्णालये हाऊसफुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:16+5:302021-04-04T04:15:16+5:30
साधारणत: फेब्रुवारी अखेरपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ...
साधारणत: फेब्रुवारी अखेरपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या रुग्णालयांमध्ये बेड मिळणे मुश्कील झाले आहे. शहरातील साखळी रुग्णालये आणि खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्येही हीच स्थिती असून या रुग्णालयांमध्येही बेड उपलब्ध होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक साखळी आणि खासगी रुग्णालयांनी प्रतीक्षा यादी तयार केली असून, ही यादी दिवसागणिक वाढत आहे. प्रतीक्षा यादीनुसार नंबर येण्यासाठी रुग्णालयांच्या दर्जानुसार कालावधी कमी-जास्त होत आहे. यामुळे तत्काळ बेडची आवश्यक्ता असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना शहरभरातील रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये बेड मिळणे अवघड झाले असून रुग्णाच्या स्थितीनुसार त्यांना दाखल करून घेतले जात आहे. अगदी छोट्या आणि नव्यानेच कोविड सेंटरची मान्यता मिळालेल्या रुग्णालयांमध्येही हीच स्थिती असल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे काहीवेळा रुग्ण गंभीर होण्याची स्थिती निर्माण होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही खाटांची संख्या वाढवावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
चौकट-
कॅशलेस सुविधा नावालाच
कोरोनाची लागण होणाऱ्या अनेक रुग्णांकडे मेडिक्लेम पॉलिसी आणि कॅशलेसची सुविधा असली तरी शहरातील केवळ मोठ्या रुग्णालयांमध्येच कॅशलेसची सुविधा मिळते. बहुसंख्य रुग्णालये इन्शुरन्स कंपनीच्या पॅनल यादीत नसल्याने या रुग्णालयांमध्ये रोख पैसे भरूनच उपचार घ्यावे लागतात. त्यानंतर मेडिक्लेमचा प्रस्ताव सादर करावा लागत असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.
चौकट-
अतिदक्षता विभाग फुल
अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्या मर्यादित असल्याने बहुतेक रुग्णालयांचा अतिदक्षता विभाग फुल्ल आहे. यामुळे रुग्णांची स्थिती पाहूनच त्यांना रुग्णालयात प्रवेश दिला जात आहे. काही ठिकाणी तर साधा बेडही मिळणे अशक्य झाले आहे.
चौकट-
कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढले
शहरातील अनेक खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तासही वाढले असल्याचे दिसून येत आहे. काही कर्मचाऱ्यांना तर सलग ड्यूटी करण्याची वेळ येते; यामुळे हे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. मात्र तरीही ते रुग्णसेवा करीत असल्याचे दिसून येत आहे.