खतप्रकल्पाचे खासगीकरणस्थायीवर

By admin | Published: December 19, 2015 11:38 PM2015-12-19T23:38:36+5:302015-12-19T23:50:41+5:30

लवकरच प्रस्ताव : हरित लवादाच्या आदेशानंतर कार्यवाहीस वेग

Private processing of fertilizer | खतप्रकल्पाचे खासगीकरणस्थायीवर

खतप्रकल्पाचे खासगीकरणस्थायीवर

Next

नाशिक : शहरातील वाढत्या प्रदूषणाला महापालिकेचेच दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे सांगत पाथर्डी शिवारातील खतप्रकल्पातील कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नाही तोपर्यंत कोणत्याही बांधकामांना परवानग्या देऊ नका, असा आदेश पुण्याच्या हरित लवादाने दिल्यानंतर पालिका प्रशासनाने खतप्रकल्पाच्या खासगीकरणाच्या कार्यवाहीला गती देण्यास प्रारंभ केला आहे. लवकरच निविदा प्रक्रियेसंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीवर मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, नववर्षाच्या प्रारंभी खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
महापालिकेच्या खतप्रकल्पाला घरघर लागली असून, तो पूर्ण क्षमतेने चालविला जात नाही. अपुरे मनुष्यबळ आणि जुनी झालेली यंत्रसामग्री यामुळे खतप्रकल्प चालविणे महापालिकेपुढे आव्हानात्मक बनले आहे. एकीकडे कचऱ्याचे ढीग साचत असल्याने आणि दैनंदिन त्याची विल्हेवाट लावणे अवघड होऊन बसल्याने परिसरातील प्रदूषणातही भर पडत आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी खतप्रकल्पाचे खासगीकरण हाच एकमेव त्यावर उपाय शोधत कार्यवाही सुरू केली होती. महासभेनेही त्यास मंजुरी दिलेली असून, गेल्या काही महिन्यांपासून निविदा प्रक्रियेबाबत घोळ सुरू होता. आयकॉस या फ्रेंच कंपनीच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील मेलहॅम यांनी खतप्रकल्प चालविण्याची तयारी दर्शविली असून, त्यांची ७०० रुपये प्रतिटन याप्रमाणे न्यूनतम दराची निविदा प्राप्त झालेली आहे. सदर खतप्रकल्प ३० वर्षे कालावधीसाठी चालविण्यास दिला जाणार आहे. महापालिका घंटागाडीमार्फत कचरा संकलन करून तो खतप्रकल्पावर नेऊन पोहोचविणार असून, त्यानंतर कचऱ्यावरची प्रक्रिया करण्यापासून खतनिर्मितीपर्यंतचे सारे व्यवस्थापन सदर कंपनीच्या हाती सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे खतप्रकल्प सुरळीत चालविण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. सदर निविदा प्रक्रियेवर काही आक्षेप आल्याने प्रस्ताव रखडला होता. सदर आक्षेपांचे निराकरण करण्याचे काम सुरू असतानाच हरित लवादाचाही आदेश आल्याने प्रशासनाने आता खतप्रकल्पाच्या खासगीकरणाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली असून, पुढील आठवड्यात स्थायीवर परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर नव्या वर्षाच्या प्रारंभीच खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा होण्याचीही शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Private processing of fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.