खासगीकरणाचा घाट, रसिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:21 AM2018-06-24T00:21:31+5:302018-06-24T00:21:46+5:30
महाकवी कालिदास कलामंदिर हे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एकमेव अद्ययावत आणि सोयीचे नाट्यगृह असून याठिकाणी नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा, छोटी साहित्य संमेलनेदेखील होतात; परंतु आता खासगीकरणानंतर असे कार्यक्रम होणे अत्यंत खर्चिक ठरणारे आहे.
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर हे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एकमेव अद्ययावत आणि सोयीचे नाट्यगृह असून याठिकाणी नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा, छोटी साहित्य संमेलनेदेखील होतात; परंतु आता खासगीकरणानंतर असे कार्यक्रम होणे अत्यंत खर्चिक ठरणारे आहे. किंबहुना यापुढे कलावंत, साहित्यिक व रसिकांना अत्यंत त्रासाचे ठरणार आहे, असे मत साहित्यिक, कलावंत व सर्वसामान्यांनी व्यक्त केले.
कालिदास नाट्यगृहाच्या खासगीकरण करण्याला
माझा विरोध आहे. त्याऐवजी एखाद्या चांगल्या संस्थेकडे नाट्यगृह चालविण्यासाठी द्यावे. सर्वसामान्य जनतेला हा आर्थिक भुर्दंड होईल, खासगीकरणामुळे तिकिटाचे दर वाढतील असे होऊ नये. यासाठी सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे. कला रसिकांना कोणत्याही कलेचा निखळ आनंद घेता यायला हवा असे वाटते. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी नाशिक शहरातील सर्व नागरिकांनी तसेच कलारसिकांनी एकत्र येऊन याबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. - सविता चतुर , सामाजिक कार्यकर्त्या, द्वारका
महाकवी कालिदास कलामंदिराचे खासगीकरण झाले तर सर्वसामान्य कलारसिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अनेक सांस्कृतिक नाटके येथे होतात; परंतु आता नाटकांचे तिकीट दरदेखील वाढतील, कारण नाट्यगृहाच्या खासगीकरणामुळे देखभालीचा खर्च वाढेल. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेले नाट्यगृह सर्वांच्या सोयीचे ठरणारे असून, शहराच्या सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे त्याचे खासगीकरण करू नये. - सुभाष सबनीस (कवी) , सचिव, नाशिक कवी संस्था