जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर : टँकर शंभरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:58 AM2018-06-12T01:58:46+5:302018-06-12T01:58:46+5:30
जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांना ९५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन अद्याप जिल्ह्यात झालेले नसल्याने पाऊस लांबणीवर पडल्यास टॅँकर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक : जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांना ९५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन अद्याप जिल्ह्यात झालेले नसल्याने पाऊस लांबणीवर पडल्यास टॅँकर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी मेअखेर जिल्ह्यात ७८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून टंचाईग्रस्त गावांची तृष्णा भागविण्यात आली होती, तथापि, पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात ११३ टक्के पाऊस पडून नदी, नाले दुथडी भरून वाहिले व धरणांमध्येही शंभर टक्केपाणी साठवणूक झाली असताना यंदा जानेवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. सिन्नर, नांदगाव, बागलाण तालुक्यांनी टॅँकरचे प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाने या प्रस्तावांमध्ये तांत्रिक दोष काढून ते परत पाठविले व ज्या गावांना पाणीटंचाई निर्माण झाली त्या गावाच्या लगत तीन किलोमीटर अंतरावर पाण्याचे स्रोत शोधण्याचा जालीम उपाय सुचविण्यात आला होता. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या उद्घाटनाचा सपाटाही लावण्यात आला तर गेल्या चार वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेत केलेल्या कामांनी भूपृष्ठातील जलपातळी वाढल्याचे दावेही करण्यात आले. प्रत्यक्षात जून महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही जिल्ह्णातील अकरा तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून, १२८ गावे व २९९ वाड्यांसाठी ९५ टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्णात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही, मात्र ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत दमदार पाऊस झाल्याशिवाय ते शक्य नाही.