कांदा उत्पादकांची अडचण
By admin | Published: August 8, 2016 10:17 PM2016-08-08T22:17:52+5:302016-08-08T22:18:20+5:30
भऊर : शासन-व्यापाऱ्यांच्या गोंधळात शेतकऱ्यांचे नुकसान
भऊर : शासनातर्फे अडत बंदचा निर्णय तर व्यापारीवर्गातर्फे कांदा विक्रीसाठी गोणीतूनच आणावा या निर्णयाच्या गोंधळामुळे गत एक महिन्यापासून बाजार समितीमधील कांद्याचे व्यवहार बंद पडून शासन व व्यापाऱ्यांच्या भांडणात कांदा उत्पादक शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडून स्थानिक बाजारपेठांमध्येही आर्थिक व्यवहार ठप्प होऊन आर्थिक मंदी आल्याचे चित्र दिसून येत आहे.
कसमादे परिसरात कांदा मुख्य पीक असून, या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून आहे. सध्या या ना त्या कारणाने कांद्याचे व्यवहार बंद असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी एकीकडे आर्थिक भांडवलाची कमतरता, तर दुसरीकडे पावसाळा वाढून आर्द्रता वाढल्याने कांदा खराब होण्याची भीती या दुहेरी संकटात सापडला आहे. कसमादे परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन कांद्याचे व्यवहार पुन्हा जुन्या पद्धतीनेच सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. डाळिंबावरील तेल्या रोग, दोन-तीन वर्षांपासूनची गारपीट, बेमोसमी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे कसमादे परिसरातील शेतकऱ्यांचे अगोदरपासूनच कंबरडे मोडलेले असताना उन्हाळी हंगामात दुष्काळी परिस्थिती असतानाही येथील कांदा उत्पादकांनी जिवाचे रान करून, कर्ज काढून, उधारी, हातउसनवारी करून बी-बियाणे, खत, खाद्याची उपलब्धता करून उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेऊन भविष्यात कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊन दोन पैसे पदरी पडतील या अपेक्षेत कांदा चाळीत साठवून ठेवला.
पूर्वीच्या खुल्या विक्री पद्धतीसाठी लहान कुटुंबातील पती-पत्नी सकाळपासून सायंकाळपर्यंत कांद्याची निवड करून एक ट्रॉली भरत असत; परंतु सध्या गोणी भरायच्या असल्यास गोणींची किंमत, मजुरी व गोणींची आदळ-आपट, वाहतूक मध्यम कांदा उत्पादकाला अशक्य असल्यामुळे कांदा उत्पादक हतबल झाला आहे.
गत हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे कसमादे परिसरातील शेतकरीवर्गाजवळ कांद्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही व हातात जगण्यासाठी पुरेसे भांडवलही नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतातील उभ्या पिकांना खत, खाद्य, निंदणी, खुरपणी, फवारणीसाठी भांडवलाची गरज असून, कसमादे परिसरातील सर्वच क्षेत्रातील नेत्यांनी, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी वर्गाने शासन व व्यापारीवर्गात मधला पर्यायाने तडजोड करून कांद्याचे व्यवहार लवकरात लवकर सुरू करावेत, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)