‘पेस्ट कंट्रोल’च्या ठेक्याबाबत घोळ कायम
By admin | Published: December 29, 2015 12:10 AM2015-12-29T00:10:51+5:302015-12-29T00:17:39+5:30
‘पेस्ट कंट्रोल’च्या ठेक्याबाबत घोळ कायम
नाशिक : पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप घोळ सुरूच असून, सध्याच्या ठेक्याची मुदत ३१ डिसेंबरला संपत असूनही प्रशासकीय स्तरावर फेरनिविदेबाबत हालचाल होताना दिसून येत नसल्याने पुन्हा एकदा स्थायीवर मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे.
पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाचे असतानाही त्यावर विचार न करता पुन्हा सहा महिन्यांसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीवर दीड महिन्यापूर्वी ठेवला होता. त्यावेळी सदस्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला होता आणि फेरनिविदा काढण्यावर ठाम राहात केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच मुदतवाढीला मान्यता देण्यात आली होती. पेस्ट कंट्रोलचा ठेका दिग्विजय कंपनीला देण्यास स्थायी समितीने यापूर्वीच विरोध केला आहे. स्थायीने आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आयुक्तांनी स्थायीचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला आहे, तर दिग्विजय कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे. शासनाकडूनही अद्याप ठरावावर काही निर्णय झाला नसल्याचे सांगितले जाते तर दिग्विजय कंपनीची याचिका सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. स्थायीवर मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला त्यावेळी प्रशासनाकडून शासन आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती. अखेर सभापती शिवाजी चुंभळे यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देत फेरनिविदा काढण्यावर स्थायी समिती ठाम असल्याचा पुनरुच्चार केला होता. आता सध्याच्या ठेक्याची मुदत संपण्यास अवघे तीन दिवस उरले असताना फेरनिविदेबाबत प्रशासनाकडून कसलीही हालचाल होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या येत्या सभेत पुन्हा एकदा प्रशासनाकडून पेस्ट कंट्रोल ठेक्याच्या मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे. यावेळी स्थायीच्या निर्णयाकडे लक्ष लागून असणार आहे.