सार्वजनिक शौचालय-गटारींची समस्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:20 PM2020-01-02T23:20:59+5:302020-01-02T23:21:32+5:30
मालेगाव : महापालिका हद्दवाढ होऊन आता दहा वर्षं पूर्ण होत आले, मात्र अजूनही अनेक भागातील समस्या जैसे थे आहेत. ...
मालेगाव : महापालिका हद्दवाढ होऊन आता दहा वर्षं पूर्ण होत आले, मात्र अजूनही अनेक भागातील समस्या जैसे थे आहेत. कलेक्टर पट्टा भाग देखील या हद्दवाढीमध्ये समाविष्ट झाला, मात्र अजूनही या भागातील जागृतीनगर, नालंदानगर, नवीन वस्ती आदी भागात नागरी समस्यांचा अभाव आहे.
कलेक्टर पट्टा भागाचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. नागरी वसाहतीच्या तुलनेत या भागात मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. या परिसरात निसर्गनगर, श्रीकृष्ण कॉलनी, शरदनगर, कॉलनी, केशव नगर, कलेक्टर पट्टा नववसाहत, जागृतीनगर, नालंदानगर आदी भाग समाविष्ट होतो. यातील काही भागांमध्ये रस्ते झाले मात्र अजूनही बऱ्याच भागात रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. तसेच नवीन वस्ती भागात स्वच्छतागृहांची समस्या कायम आहे. या प्रभागामध्ये काही भाग वगळता सांडपाणी गटारींची सोय नाही त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडत आहे. परिसरात रस्ते अरुंद असल्याने शोषखड्डे भरले आहेत. त्यामुळे बºयाचदा सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने त्यातून वादही होतात. जागृतीनगर, नालंदानगर येथील मोकळ्या भूखंडावरही मोठ्या प्रमाणात कचºयाचे साम्राज्य आहे. त्यामुळे या भागाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन करणाची गरज आहे. कलेक्टर पट्ट्यातील शौचालय तसेच गटारींची समस्या गंभीर असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दंगल पीडितांची वसाहत म्हणून कलेक्टरपट्टा नावारुपाला आला आहे. प्रारंभी सोयगाव ग्रामपंचायत व महापालिकेतही कलेक्टरपट्ट्याचा सहभाग नसल्याने नागरिकांना नागरी समस्यांना सामोरे जावे लागत होते. हद्दवाढीनंतर कलेक्टरपट्ट्याचा समावेश महापालिकेत झाला आहे. नगरसेवक मदन गायकवाड यांनी या भागातील कच्चे रस्ते पक्के केले आहेत. जलकुंभ उभारुन जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. या भागात सुरळीत पाणीपुरवठा केला जात आहे. रस्ते व पाण्याची समस्या सुटली असली तरी सार्वजनिक शौचालय व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या कलेक्टरपट्टा भागात काही सुविधा मिळाल्या आहेत. मात्र सार्वजनिक शौचालय, स्वच्छता, गटारींची समस्या जैसे थेच आहे.
- रंजना धाबडले, रहिवासी
मनपात समावेश होऊन दहा वर्षं उलटली आहेत. रस्ते व जलवाहिनीचे प्रश्न निकाली निघाले असले तरी नालंदानगर, नवीवस्ती परिसरात नागरी सुविधांची वानवा आहे. मनपाने या भागात स्वच्छता मोहीम राबवावी.
- दीपा मंडाळे, रहिवासी