वंचितांच्या समस्या लेखकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:11 AM2021-07-19T04:11:45+5:302021-07-19T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझी बालपणाची १६ वर्षे ग्रामीण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे. माझी बालपणाची १६ वर्षे ग्रामीण भागात गेली. त्यातूनच शोषितांचे, वंचितांचे दु:ख जवळून अनुभवलेले आहे. ज्यांनी कुणी समाजातील हे चित्र अनुभवले आहे, त्यांनी ते आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडणे आवश्यक असल्याचे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.
साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने ऑनलाइन गुगलमिटद्वारा विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाचे व्दितीय पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी बोलताना देशमुख यांनी, बालमजुरीवर मी कादंबरी लिहण्यामागेही तीच भावना असल्याचे सांगितले. बालपणाचा हक्क हिरावून घेणे यासारखे दुसरे क्रूर कृत्य नाही. तसेच स्त्री भ्रूण हत्या, पाणीटंचाई हे समाजासमोरील ज्वलंत विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य प्रवास संपत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रवास सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. मायमराठीसह मला उर्दू भाषा खूप आवडते त्यावरही मी लिहित असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष देवचंद महाले पाटील यांनी, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष किरण सोनार यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी आभार मानले.