नोंदणी नसल्यास किंवा प्रमाणपत्र मिळाले नसल्यास समस्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:45+5:302021-07-01T04:11:45+5:30
नाशिक : जून महिन्याच्या उत्तरार्धात लसीकरणाला काहीसा वेग येऊ लागला आहे. आता १८ वर्षांपासून वरील सर्व वयोगटांसाठीच्या लसी देण्यात ...
नाशिक : जून महिन्याच्या उत्तरार्धात लसीकरणाला काहीसा वेग येऊ लागला आहे. आता १८ वर्षांपासून वरील सर्व वयोगटांसाठीच्या लसी देण्यात येत आहेत. मात्र, विशेषत्वे ज्या ज्येष्ठ नागरिकांना पहिली लस केव्हा दिली, त्यासाठी कुणाचा मोबाइल नंबर दिला होता, त्याचे प्रमाणपत्रच मिळाले नाही, अशा व्यक्तींना दुसरा डोस घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील तसेच एकट्या वृद्ध व्यक्तीला पहिल्या डोसचे प्रमाणपत्र नक्की मिळाले की नाही, तेदेखील माहिती नसल्याने त्यांना दुसरा डोस कसा, कुठला आणि कधी द्यायचा, असा पेचदेखील निर्माण झाला आहे.
जे नागरिक लसींबाबत तसेच त्यांच्या प्रमाणपत्राबाबत दक्ष आहेत, त्यांनी स्वत:च्या लसींचे आलेले प्रमाणपत्र मोबाइलमध्येच सुरक्षित ठेवले आहे. मात्र, जे नागरिक तितकेसे टेक्नोसॅव्ही नाहीत, ज्यांना मोबाइल केवळ फोन घेण्यापुरताच वापरता येतो, त्यांना तसेच विशेषत्वे वयोवृद्ध गटातील नागरिकांसाठी ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे मोबाइल नसतो, त्यांनी पहिल्या डोसवेळी कुणाचा मोबाइल नंबर दिला किंवा नंबरच नाही असे सांगितले, त्यांना तेदेखील आठवत नाही. तर, काहींचे ऑनलाइन प्रमाणपत्रच अपलोड झालेले नसून संबंधित नागरिकांना तशी कल्पनाही नसल्याने त्या परिस्थितीत दुसरा डोस कसा द्यायचा, असा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांपुढेदेखील निर्माण होतो. विशेषत्वे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच काही आदिवासी तालुक्यांमध्ये ही समस्या आढळून येत आहे.
मोबाइलच नाही
पहिला डोस घेताना त्यांनी मोबाइल नंबर विचारला होता. पण, माझ्याकडे मोबाइल नाही आणि पोराचे आणि माझे पटत नसल्याने माझ्या कोणत्या नात्यातल्याचा मोबाइल नंबरपण नाही. मी तसेच सांगितले होते. आता ते पहिल्या लसीचे प्रमाणपत्र विचारत आहेत. मी कुठून देऊ ते त्यांनापण सांगता येत नाही.
काशिनाथ पावरा, नागरिक
मोबाइल नंबर बदलला
माझ्याकडे मोबाइल नसल्याने मी पहिला डोस घेताना माझ्या पुतण्याचा मोबाइल नंबर दिला होता. पण, पुतण्याची नोकरी सुटल्याने त्याचा मोबाइलपण कंपनीने काढून घेतला. त्यामुळे त्याच्याकडेपण तो नंबर राहिला नाही. मग, आता मी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र कुठून देणार? आणि मला दुसरी लस कशी मिळणार?
शंकर काकळीज, नागरिक
लसीकरणावेळी ही घ्या काळजी
लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी ज्या मोबाइलवरून केली असेल, त्याच मोबाइलवर डोससंदर्भातील प्रमाणपत्र येते.
लसीकरणावेळी आपलाच मोबाइल नंबर सांगणे आवश्यक असते. मात्र, ज्यांच्याकडे स्वत:चा मोबाइल नाही, त्यांनी जवळच्या नातेवाइकाचा नंबर देणे अपेक्षित असते.
लस घेतल्यानंतर त्याच दिवशी प्रमाणपत्र मोबाइलवर येत असते.
ते प्रमाणपत्र मोबाइल हुशारीने हाताळणाऱ्या कुणाही व्यक्तीकडून डाऊनलोड करून घेऊन जवळ ठेवणे आवश्यक आहे.
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास...
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र आपण डोस घेतल्यानंतर त्याच दिवशी तत्काळ मोबाइलवर येत असते. मात्र, काही भागांत कनेक्टिव्हिटीमुळे अडचणीचे होते. तरीपण, ज्या व्यक्तीने दुसऱ्या कुणाचा मोबाइल नंबर दिलेला असेल, तर त्या व्यक्तीने तो नंबर आठवून सांगणे आवश्यक असते. अनेकदा दुसऱ्या डोसला आल्यानंतर पहिल्या डोसवेळी सांगितलेला नंबर त्यांच्या लक्षात राहत नाही. मात्र, नागरिकांनी किमान स्वत: सांगितलेला नंबर जरी लक्षात ठेवला, तरी तेवढे पुरेसे आहे.
---------
ही डमी आहे.