पाण्याबरोबर अस्वच्छतेची समस्या

By admin | Published: November 14, 2016 12:55 AM2016-11-14T00:55:22+5:302016-11-14T00:56:17+5:30

महात्मानगर, कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी : उद्याने उद्ध्वस्त, वाहतुकीची कोंडी

Problems of uncleanness with water | पाण्याबरोबर अस्वच्छतेची समस्या

पाण्याबरोबर अस्वच्छतेची समस्या

Next

संजय पाठक नाशिक
उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जाणारा नवीन प्रभागरचनेतील प्रभाग क्रमांक १२ मध्ये यंदा सर्वच पक्षांची खिचडी होणार आहे. गेल्या पाच महापालिका निवडणुकीत मतदारांनी या प्रभागातून प्रामुख्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या या मोठे भौगोलिक क्षेत्र असलेल्या प्रभागात सर्वच पक्षांचा कस लागणार आहे. उच्चभ्रूंची वसाहत असली तरी हा भाग समस्यामुक्त नाही हे तितकेच खरे. रस्ते, पाणी, अस्वच्छता आणि वाहतूक अशा अनेक समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेनुसार सध्याचे तीन प्रभाग मिळून नवा प्रभाग क्रमांक १२ तयार झाला आहे. महात्मानगरपासून सुरू होणार हा प्रभाग एकीकडे सीटी सेंटर मॉल आणि तेथून नासर्डी नदीकाठाने थेट मुंबई नाक्यापर्यंत भिडला आहे. महामार्ग आणि ठक्कर बसस्थानकानंतर शरणपूररोड आणि कॉलेजरोडने लोकमत सर्कल समोरील बाजूने पुन्हा समर्थनगर, महात्मानगर असा विस्तारला गेला आहे. या भागात गेल्या पाच वर्षांत रस्त्यांची प्रामुख्याने कामे झाली आहेत. तसेच नाव घेण्यासारखा म्हणावा असा नाशिक महापालिका आणि नाशिक फर्स्ट या संस्थेचा ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क प्रकल्प साकारला गेला आहे. त्या व्यतिरिक्त मग ग्रीन जीम आणि किरकोळ विकासकामे झाली आहेत. प्रश्न केवळ विकासकामांचा नाही तर मूलभूत समस्यांचाही आहे. प्रभागात अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. टिळकवाडी परिसरातील नागरिक त्यामुळे हैराण झाले आहेत. प्रभागातील कुलकर्णी कॉलनी उद्यान, राका कॉलनी उद्यान, स्नेहबंधन पार्क येथील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. संभाजी चौकासारख्या भागात नासर्डी नदीच्या पुराचा प्रश्न असून, अनेक भागात कचराकुंड्यांची अवस्था बिकट झाली आहे. प्रभागात आठ झोपडपट्ट्या असून, त्यांच्याही अनेक समस्या आहेत. शहरातील उच्चभ्रू परिसरात मोडल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक बारामधील एकंदर राजकारण बघितले तर येथे सुरुवातीचा काळ वगळता भाजपाने जम बसवला आहे. महापालिकेची प्रथम निवडणूक झाली, त्यावेळी म्हणजे १९९२ मध्ये महात्मानगर- समर्थनगर परिसरातून भाजपाचे लक्ष्मण सावजी निवडून आले. परंतु त्यानंतर शिवाजी गांगुर्र्डे यांनी चार वेळा सलग विजय मिळवला आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत त्यांच्या बरोबर सध्याच्या आमदार निर्मला गावित यांनीही प्रतिनिधित्व केले आहे. तर गेल्या दोन पंचवार्षिक राष्ट्रवादीच्या छायाताई ठाकरे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यापुढील भागात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे यांनी गेल्या पाच पंचवार्षिकपासून कायम ठेवला आहे. त्यांच्या जोडीला भाजपाचे मधुकर हिंगमिरे यांनी या भागाचे नेतृत्व केले आहे. सध्या कॉँग्रेसच्याच योगीता अहेर यादेखील प्रतिनिधित्व करीत आहेत. मुंबई नाका आणि टिळकवाडी परिसरात पहिल्या पंचवार्षिकला निर्मलाताई कुटे, कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील, मनसेच्या सुजाता डेरे, मुंबई नाका परिसरात वसंत गिते, अरुण पवार, सविता मोटकरी यांच्यासह अनेकांनी प्रतिनिधित्व केले आहे. तीन प्रभाग एकत्र आल्याने राजकीय समीकरणे जटिल झाली आहेत.तिडके कॉलनी : शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक पूल धोकादायक ठरतात. मात्र, मिलिंदनगर येथील पूल एरवीही धोकादायक ठरतो.

Web Title: Problems of uncleanness with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.