कोरोना झाल्यानंतर वजनवाढीची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:13 AM2021-02-08T04:13:24+5:302021-02-08T04:13:24+5:30
नाशिक : कोरोनाच्या बहराच्या काळात देशभरातील सुमारे एक चतुर्थांश नागरिकांना कोरोना होऊन गेला. प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची तीव्रता, ...
नाशिक : कोरोनाच्या बहराच्या काळात देशभरातील सुमारे एक चतुर्थांश नागरिकांना कोरोना होऊन गेला. प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची तीव्रता, त्याची लक्षणे विभिन्न आढळून आली. त्यात काही व्यक्तींना तर कोरोना होऊन गेल्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये वजनवाढीच्या तक्रारींचादेखील सामना करावा लागला आहे. ही वजनवाढ किमान ५ ते १० किलो इतकी असून आता अनेकांना या समस्यांवर उपाय करण्यासाठी डॉक्टरांकडे, फिटनेस तज्ज्ञांकडे जाऊन प्रयत्न करावे लागत आहेत.
भारतातील बहुतांश लोकांना वर्क फ्रॉम होममुळे प्रदीर्घ काळ घरूनच काम करावे लागले. कुटुंबातील सर्व सदस्य घरीच बसल्याने प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार खाद्यपदार्थांची चंगळ करण्यात आली. त्यामुळे आधीच वर्क फ्रॉम होममुळे नागरिकांच्या वजनात आधीच वाढ झाली होती. त्यात क्वचित कुणाला कोरोना झालाच तर प्रारंभीच्या काळात जरी त्या व्यक्तीच्या वजनात थोडीशी घट आली असली तरी कोरोनामुक्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला डॉक्टराच्या सल्ल्यानुसार अधिकाधिक पौष्टिक पदार्थ खाऊ घातले जातात. त्यानंतरच्या महिनाभरात तो रुग्ण त्याचे नाॅर्मल रुटीन सुरू करतो. मात्र, तोपर्यंत वजन वाढायला लागलेले असते. कुणाचे ४-५ किलो वाढते तर कुणाचे १०-१२ किलोपर्यंत वाढल्याचे प्रकार घडत आहेत.
लॅपटॉपवर चुकीच्या स्थितीत काम केल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. यावेळी, सांधेदुखीच्या वेदना, मणक्याच्या समस्या, पाठदुखी, खांदा दुखणे यासारख्या समस्या लोकांमध्ये निर्माण आहेत. संगणक आणि मोबाइलच्या पडद्यावर सतत काम केल्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळ्यांतून पाणी आणि कमी झोप यासारख्या समस्या वाढल्या आहेत. तसेच सतत बसून काम केल्याने वजनदेखील वाढले आहे.
इन्फो
वजन वाढल्याने पायदुखी
कोरोनामुळे वजन वाढल्याने विविध वयोगटातील नागरिकांमध्ये सध्या पाय दुखण्याची तक्रार होताना दिसते. काही वेळा खूप धावपळ झाली म्हणून तर काही वेळा बराच काळ उभे राहिल्याने, चालल्याने पाय दुखतात. तर काही जणांचे कोरोनामुळे वजन जास्त वाढल्याने गुडघे आणि टाचा दुखतात. तर काहींचे तळपाय, नडगीचे हाड, पोटऱ्या दुखण्याच्यादेखील तक्रारी आहेत.
इन्फो
तोंडाला चव असलेल्यांचे प्रमाण अधिक
कोरोना होऊन गेल्यानंतर अनेक नागरिकांच्या तोंडाची चव महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ गेली होती. तर अनेकांच्या तोंडाला पूर्वीसारखीच चव होती. वजन वाढलेल्या व्यक्तींच्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने ज्यांच्या तोंडाला चव कायम होती, त्यांचाच अंतर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.
६२ चे झाले ६८
माझे वजन कोरोनापूर्वीच्या काळात साधारणपणे ६० ते ६२ किलोपर्यंत कायम होते. मात्र, कोरोनानंतरच्या दोनच महिन्यांनी वजन केले असता ते ६८ किलोहून अधिक भरले. ते आता कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
५७ किलोवरून ६५ किलाे
कोरोनापूर्वीच्या काळात माझे वजन सातत्याने ५५ ते ५७ किलो राहात होते. मात्र, कोरोना झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात औषधे, इंजेक्शन्स तसेच पौष्टिक खाद्यपदार्थांच्या खाण्यात वाढ झाल्याने वजन तब्बल ८ किलो वाढले आहे.
७१ किलोवरून ८० किलो
कोरोना काळात अधिक प्रमाणात प्रोटिन्स खायला सांगितल्याने प्रोटीन पावडरपासून अत्यंत पौष्टिक खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळे माझे वजन ७१ किलोवरून थेट ८० किलोवर पोहोचले असल्याने चिंता वाढली आहे.
७५ चे ८२ किलो
अनेक वर्षांपासून माझे वजन ७५च्या आसपास कायम होते. मात्र, कोरोना झाल्यानंतरच्या काळात एकूण प्रोटीन वाढण्यासह सामिष भोजनातही वाढ झाल्याने वजन तब्बल ७ किलोने वाढले असल्याचे लक्षात आले.
---------------
ही डमी आहे.