मराठी विद्यापीठ निर्मितीचा कार्यवाहीचा संमेलनात व्हावा निर्णय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:47+5:302021-02-27T04:17:47+5:30
नाशिक : दक्षिणेकडील बहुतांश स्वभाषाप्रेमी राज्यांनी त्यांच्या राज्यात उभारलेल्या त्यांच्या भाषेच्या विद्यापीठांप्रमाणे महाराष्ट्रातही मराठीचे विद्यापीठ उभारले जावे, यासाठी यापूर्वीच्या ...
नाशिक : दक्षिणेकडील बहुतांश स्वभाषाप्रेमी राज्यांनी त्यांच्या राज्यात उभारलेल्या त्यांच्या भाषेच्या विद्यापीठांप्रमाणे महाराष्ट्रातही मराठीचे विद्यापीठ उभारले जावे, यासाठी यापूर्वीच्या अनेक साहित्य संमेलनांमध्ये ठराव झाले, त्यावर अनेकदा तत्कालीन मंत्र्यांनी पाठपुरावा करण्याची संमेलनस्थळी अनेकदा वचनेदेखील दिली. मात्र, त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. त्यामुळे नाशिकच्या साहित्य संमेलनात मराठी विद्यापीठाचा ठराव नव्हे तर विद्यापीठ कधी उभारले जाणार त्याबाबतचा जाब विचारला जायला हवा, अशीच मराठी रसिकांची भावना आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व मराठी ज्ञान-रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी मराठी विद्यापीठ होणे ही तातडीची गरज असल्याची भावना मराठीतील अनेक ज्येेष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनी विचारवंतांनी यापूर्वीच बोलून दाखवली आहे. भाषिक ओळख कायम राखण्यासह मराठी संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी स्वतंत्र मराठी विद्यापीठाचा त्यासाठी वर्षानुवर्ष आग्रह केला. गत दशकापासूनदेखील प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य महामंडळाने यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, अद्यापही हाती काहीच आलेले नाही. त्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात आता ठराव नको तर शासनाला जाब विचारण्याची गरज असल्याचे मराठीप्रेमी नागरिकांची भावना आहे.
इन्फो
मराठी ज्ञानभाषेसाठीही व्हावा पाठपुरावा
मराठी ज्ञानभाषा व्हावी, याकरिता शासनाने मराठी भाषेच्या विकासप्रक्रियेस चालना द्यावी, असा ठराव यापूर्वीच्या राज्य शासनांनी मंजूर केलेला आहे. मात्र, ती ज्ञानभाषा होण्यासाठी आता साहित्यिकांना आणि साहित्य महामंडळालादेखील संमेलनांच्या माध्यमातून सक्रिय होण्याची गरज आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हीदेखील प्रलंबित मागणी संमेलनाच्या निमित्ताने धसास लावण्याची आवश्यकता आहे.
इन्फो
नाशिकलाच व्हावे मराठी विद्यापीठ
नाशिकच्या साहित्य संमेलनाला छगन भुजबळ यांच्यासारखे मराठीप्रेमी (पालकमंत्री कटाक्षाने मास्क हा इंग्रजी शब्द न वापरता मुखपट्टी म्हणतात.) स्वागताध्यक्ष लाभले असून राज्य मंत्रिमंडळात त्यांच्या शब्दाला वजनदेखील आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेले मराठी विद्यापीठ उभारायचेच झाल्यास ज्या कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्यांच्याच नाशिक नगरीत होण्याबाबतचा पाठपुरावादेखील संमेलनाच्या माध्यमातून व्हायला हवा.
इन्फो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.