दोनशे मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची कार्यवाही
By admin | Published: July 22, 2016 12:21 AM2016-07-22T00:21:20+5:302016-07-22T00:24:19+5:30
आजपासून : १९२ उमेदवारांना बोलविले
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात रिक्त असलेल्या २०५ मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही शुक्रवारी (दि.२२) शासकीय कन्या शाळा येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरण्यासाठी पात्र असलेल्या १९२ उमेदवारांना पदोन्नतीच्या कार्यवाहीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता शासकीय कन्या शाळेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. ही पदोन्नतीची कार्यवाही समुपदेशनाने करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांच्या २०५ रिक्त जागांमध्ये सर्वाधिक मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा निफाड तालुक्यात ४५ इतक्या, तर त्याखालोखाल येवला तालुक्यात ३३ इतकी मुख्याध्यापकांची रिक्त पदे
आहेत. शुक्रवारी होणाऱ्या या पदोन्नतीच्या कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आता जुलै उलटत आल्यानंतर दोनशेहून अधिक मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)