नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची प्रक्रिया सुलभ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:38+5:302021-06-18T04:11:38+5:30
नाशिक : कोविड-१९ च्या परिस्थितीत आरोग्य सेवा संदर्भात आलेल्या त्रुटी टाळण्यात याव्या यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठीची ...
नाशिक : कोविड-१९ च्या परिस्थितीत आरोग्य सेवा संदर्भात आलेल्या त्रुटी टाळण्यात याव्या यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठीची प्रक्रिया आणखी सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्ययावत करण्यासंदर्भात गुरुवारी (दि. १७) विदर्भ विभागाची ऑनलाईन बैठक झाली. यावेळी विद्यापीठाचा सन २०२२ ते २०२७ करीता तयार करण्यात येणारा बृहत आराखडा सर्वसमावेशक असावा असा सूर बैठकीत उमटला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीस डॉ. राजेश गोंधळेकर, डॉ. विजय गोलावार, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. किशोर मालोकर, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. धनाजी बागल यांच्यासमवेत आरोग्य क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, महाविद्यालयांचे अधिष्ठाता व प्राचार्य ऑनलाईन उपस्थित होते. या ऑनलाईन बैठकीचे समन्वयन नियोजन विभागाचे प्र. संचालक डॉ. राजीव आहेर यांनी केले.
कोट-
विद्यापीठाने विविध विद्याशाखांचे कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या कोविड-१९ मध्ये आलेल्या परिस्थितीत पॅरामेडिकल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कमी संख्या भरून काढता येईल. यासाठी विविध अभ्यासक्रम व संशोधन प्रकल्पांना चालना देण्यात यावी. विशेषता विदर्भातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल.
-डॉ. किशोर मालोकर, अधिसभा सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ