जातीचे दाखले मिळण्याची प्रक्रिया शाळेतूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:21 AM2019-07-30T01:21:01+5:302019-07-30T01:21:26+5:30
दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे जातीचे तसेच अन्य दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये तसेच महाआॅनलाइन केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करीत असल्याने सर्व्हर डाउन होऊन प्रत्यक्ष प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास अडचण निर्माण होते.
नाशिक : दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे जातीचे तसेच अन्य दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये तसेच महाआॅनलाइन केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करीत असल्याने सर्व्हर डाउन होऊन प्रत्यक्ष प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढला असून, येत्या १ आॅगस्टपासून जातीचे दाखले काढण्यासाठीची प्रक्रिया ही शाळेतूनच राबविली जाणार आहे. यामुळे केंद्रांवरील भार कमी होणार आहेच शिवाय प्रवेशासाठी येणारी अडचणही कमी होणार असल्याने सदर उपक्रम प्रभावीपणे अंमलात आणणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दहावीच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाच्या तारखेपर्यंतही दाखले मिळत नाही. सर्व्हर डाउन झाल्यामुळे, तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होऊन जाते. यंदाही हा प्रश्न प्रकर्षाने समोर आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शाळांमधूनच विद्यार्थांना दाखले वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
जे विद्यार्थी इयत्ता नववी आणि दहावीत असतील त्यांच्या दाखल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जातीचे दाखले काढण्यासाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयातीच करतील. विद्यार्थ्यांचे सर्व अर्ज कागदपत्रांसह प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाºयांच्या मार्फत सर्व अर्ज संबंधित प्रांत यांच्याकडे सुपुर्द केले जातील. जातीचे दाखले तयार झाल्यानंतर ते शाळेतूनच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. किती दाखले आणि कोणत्या विद्यार्थ्याचे दाखल वितरीत करण्यात आले याची माहिती प्रांत कार्यालयाकडे उपलब्ध राहणार आहे. जेणे करून शाळा पातळीवर विद्यार्थ्यांचा अडचण आसल्याच प्रांत कार्यालयाकडून याबाबतची माहिती शाळेला कळविणे सुलभ होणार आहे.
जातीचे दाखले हे पालकांच्या मूळ जन्मगावातूनच वितरित केले जात असल्यामुळे अशी प्रकरणे आल्यास ती संबंधित प्रांतांकडे वर्ग केली जातील याबाबतची निश्चित आणि सुलभ कार्यपद्धती तयार केली जाणार आहे.
मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल
दहावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी लागणाºया दाखल्यांसाठी शहरातील सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होते. हजारोंच्या संख्येने या केंद्रांच्या माध्यमातून दाखले देण्याची प्रक्रिया राबविली जाते. यंदादेखील मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले, मात्र सर्व्हर यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे असंख्य दाखले अडकून पडले होते. त्यामुळे अर्ज स्वीकृती आणि दाखले वितरणाची संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडली होती. ही बाब लक्षात घेऊन संभाव्य अडचणी टाळण्याबरोबरच विद्यार्थ्यांची धावपळ कमी करण्यासाठी शाळा पातळीवरच दाखले वितरित करण्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.