बाशिंगे अन् येसोजी वीरांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:56 AM2019-03-22T01:56:31+5:302019-03-22T01:56:59+5:30
वाजत गाजत डोक्यावर बाशिंग बांधून भगवे वस्त्र परिधान करत पारंपरिक प्रथेनुसार गुरुवारी (दि.२१) जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बाशिंगे वीराची मिरवणूक काढण्यात आली. तसेच घनकर गल्लीतून येसोजी महाराज वीरालाही वाजत-गाजत परिसरातून मिरवण्यात आले.
नाशिक : वाजत गाजत डोक्यावर बाशिंग बांधून भगवे वस्त्र परिधान करत पारंपरिक प्रथेनुसार गुरुवारी (दि.२१) जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बाशिंगे वीराची मिरवणूक काढण्यात आली. तसेच घनकर गल्लीतून येसोजी महाराज वीरालाही वाजत-गाजत परिसरातून मिरवण्यात आले.
हळदीच्या नवरदेवाचा घातपाती मृत्यू झाल्यामुळे विवाहाची इच्छा अपूर्ण राहिली तेव्हापासून हा वीर बाशिंग लावून मिरवीत लोकांचे प्रश्न सोडवित आहे, अशी अख्यायिका बाशिंगे वीराच्या मिरवणुकीमागे सांगितली जाते. दरवर्षी बुधवार पेठेतून विनोद बेलगावकर बाशिंगे वीराच्या भूमिक ा साकारून पारंपरिक वाद्याच्या तालावर दुपारपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत गावातून थिरकत गोदाघाटावरून वळसा घालत पुन्हा बुधवार पेठेत येतो. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पारंपरिक वाद्य वादनाचा गजर करत बाशिंगे वीराची मिरवणुकीला बुधवारपेठेतून सुरुवात करण्यात आली. बुधवारपेठ, चव्हाटा, काजीपुरा, वाकडी बारव, दूधबाजार, भद्रकाली अशा विविध परिसरांतून वाजतगाजत मिरवत वीर रात्रभर नृत्य करत गंगाघाटावर पोहचले. रात्रभर चाललेल्या या मिरवणुकीचा समारोप पहाटे करण्यात आला.
दरम्यान, संध्याकाळी घनकरगल्ली येथील तुळजाभवानी मंदिरापासून येसोजी महाराज वीराची पारंपरिक मिरवणूक मोरे कुटुंबीयांकडून काढण्यात आली. सदानंद मोरे हे वीराच्या भूमिकेत होते. या मिरवणुकीला सुमारे १६० वर्षांची परंपरा आहे. तसेच रविवार कारंजा येथून मानाचा दाजीबा वीराची मिरवणूक भागवत कुटुंबियांकडून काढण्यात आली.
बालवीरांनी वेधले लक्ष
गोदाकाठावर पेटविण्यात आलेल्या होळीभोवती बालवीरांनी फेºया मारत धुळवडीचा आनंद लुटला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्यासह भोले शंकर, भगवान श्रीकृष्ण, श्री खंडेराव वेशभूषेत बालके दिसून आली. या बालवीरांनी वाजत गाजत नृत्य करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
म्हणून पडले बाशिंगे अन् दाजिबा नाव
४‘बाशिंगे’ आणि ‘दाजिबा’ हे नाव या वीराला पडले त्यामागे मोठी अख्यायिका सांगितली जाते. लग्न मांडवात जाताना नवरदेवाला ‘दाजी’ म्हणून संबोधिले जाते म्हणून ‘दाजिबा’ तर हळद लावल्यानंतर बाशिंग लावून नवरदेव मिरवितो म्हणून ‘बाशिंगे’ असे नाव पडल्याचे बोलले जाते.