शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:23 AM2019-03-24T00:23:58+5:302019-03-24T00:24:33+5:30

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करणाऱ्या घोषणांसह ढोल-ताशांच्या गजरात नाशिकमधील काही मंडळांनी शनिवारी (दि.२३) तिथीनुसार शिवजयंतीचा जल्लोष साजरा केला.

 Procession in the city for Shiv Jayanti | शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक

शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक

Next

नाशिक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करणाऱ्या घोषणांसह ढोल-ताशांच्या गजरात नाशिकमधील काही मंडळांनी शनिवारी (दि.२३) तिथीनुसार शिवजयंतीचा जल्लोष साजरा केला.
वाकडी बारव येथून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महंत भक्तिचरणदास, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, रामसिंग बावरी, बबलू परदेशी, सत्यम खंडाळे, करण बावरी आदींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. या मिरवणुकीत शहरातील हिंदू एकता पक्ष, अखिल भारतीय कातारी-शिकलकर समाजसंघ, शहीद भगतसिंग क्रांतिदल, भोईराज मित्रमंडळ व समस्त भोई समाज, श्री शनैश्चर युवक समिती आदी मंडळांना मिरवणुकीत विविध चित्ररथांच्या माध्यमातून संत तुकाराम शिवाजी महाराज यांच्या भेटीच्या देखाव्यासह छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याचे मावळे, आदिशक्ती तुळजाभवानी यांसह विविध देखाव्यांनी शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. ध्वनिप्रदूषणामुळे डीजे वापरावर बंदी घालण्यात आल्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत पारंपरिक ढोल- ताशांसारख्या वाद्यांवर शिवभक्तांनी ठेका धरला. जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर ही मिरवणूक दादासाहेब फाळकेरोड, महात्मा फुले मार्के ट, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली बाजार, संत गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौकमार्गे रामकुंड येथे रात्री मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी शिवप्रेमींच्या डोक्यात भगव्या टोप्या, भगवे फेटे, भगवे ध्वज बघायला मिळाले. महिलांनीही भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी शिवभक्तांनी ढोलपथकाच्या तालावर ठेका धरीत स्वराज्याचा भगवा फडकवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. यावेळी काही शिवप्रेमींनी दांडपट्टा, गोफणसारख्या खेळांची प्रात्यक्षिके ही सादर केली.
मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी मिरवणुकीत सहभागी असलेल्या मंडळांच्या अध्यक्ष तसेच मंडळातील पदाधिकाऱ्यांना स्वागत कक्षाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी मिरवणूक मार्गाच्या विविध टप्प्यांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे जसजशी मिरवणूक पुढे सरकत होती तशी पोलिसांची दक्षता वाढत होती. तसेच मिरवणूक पुढे जात असताना मागील मार्ग मोकळा करण्याची दक्षताही यावेळी पोलिसांनी घेतली.

Web Title:  Procession in the city for Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.