बुधवारी ‘जुलूस’ : पैगंबर जयंतीनिमित्त शहरात सजावटीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 06:36 PM2018-11-19T18:36:18+5:302018-11-19T18:42:05+5:30
पैगंबर जयंतीनिमित्त शासकिय सुटी मंगळवारी (दि.२०) जाहीर करण्यात आली असली तरी इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना रबीऊल अव्वलचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.९) घडल्यामुळे ईद-ए-मिलाद एक दिवस पुढे ढकलली गेली.
नाशिक : इस्लामचे अंतीम प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात साजरी होत आहे. सर्वत्र सजावटीची लगबग पहावयास मिळत असून मशिदी विद्युत रोषणाईने नटल्या आहेत. बुधवारी (दि.२१) पारंपरिक ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक जुने नाशिकमधून काढण्यात येणार आहे.
पैगंबर जयंतीनिमित्त शासकिय सुटी मंगळवारी (दि.२०) जाहीर करण्यात आली असली तरी इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना रबीऊल अव्वलचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.९) घडल्यामुळे ईद-ए-मिलाद एक दिवस पुढे ढकलली गेली. उर्दू महिन्याच्या १२ तारखेनुसार बुधवारी शहरात ईद-ए-मिलाद साजरी करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह सर्व धर्मगुरूंच्या बैठकीत घेतला गेला. त्यानुसार मागील शुक्रवारी खतीब सर्व मशिदींमधून जाहीर पत्रक पाठवून समाजबांधवांपर्यंत माहिती पोहचविली. त्यानुसार समाजबांधवांनी जयंतीच्या तयारीला सुरूवात केली. जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सातपूर आदि मुस्लीम बहूल परिसरात जयंतीचा उत्साह पहावयास मिळत आहे. या भागातील विविध सामाजिक मित्र मंडळांसह धार्मिक संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आपआपल्या परिसरात आकर्षक सजावट के ली जात आहे. तसेच पैगंबर साहेबांच्या ‘मदिना शरीफ’ची प्रतिकृतींसह आकर्षक होर्डिंग्जची उभारणी करण्यावर भर दिला जात आहे. काही मंडळांनी पैगंबर साहेबांची शिकवण, संदेशाची माहितीदेणारे फलकही उभारले आहेत. इस्लामी हिरवे ध्वज, पताकांसह विद्युत रोषणाईच्या माळांना बाजारपेठेत मागणी वाढली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सजावट साहित्यांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याची चर्चाही ऐकू येत आहे. जुने नाशिक, वडाळागाव परिसरातील मुस्लीम बहुल भागात सजावट साहित्यांची दुकाने थाटली आहेत. एकूणच सर्वत्र पैगंबर जयंतीचा उत्साह पहावयास मिळत आहे.
‘डीजे’ला मिरवणूकीत बंदी
जुने नाशिकमधून काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीत कुठल्याही मंडळाने डीजे’ ध्वनी व्यवस्थेसह सहभागी होऊ नये. डीजेमुक्त जुलूस सालाबादप्रमाणे यावर्षीही काढण्यात येणार आहे. कायदासुव्यवस्थेचे पालन करत समाजबांधवांनी स्वयंशिस्त बाळगून मिरवणूकीत सहभागी व्हावे, असे आवाहन खतीब यांच्यासह धार्मिक संघटनांनी केले आहे. ‘डीजे’बंदी व स्वयंशिस्तीचा नियम वडाळागावातून बुधवारी काढण्यात येणाºया मिरवणूकीलाही लागू आहे. त्यासंदर्भात येथील जामा गौसिया मशिदीचे धर्मगुरू मौलाना जुनेद आलम यांनीही विविध सूचना दिल्या आहेत.