सुगंधी वनस्पतींच्या उत्पादनातून ‘त्यांनी’ जीवन बनविले सुसह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:43+5:302021-08-01T04:13:43+5:30
सचिन सांगळे नांदूरशिंगोटे : तालुक्यातील शेतकरी कृषी क्षेत्रातही सातत्याने नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. त्याच धर्तीवर पारंपरिक शेतीला फाटा ...
सचिन सांगळे
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील शेतकरी कृषी क्षेत्रातही सातत्याने नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. त्याच धर्तीवर पारंपरिक शेतीला फाटा देत तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील शेतकरी बंधूंनी आपल्या दीड एकर शेतात जिरेनिअमची लागवड केली आहे. जिरेनिअमवर प्रक्रिया करून तेलनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला. त्यापासून त्यांनी सहा महिन्यांत एक एकरपासून अडीच लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. जमिनीखालील पाण्याचा विहिरीच्या माध्यमातून पिके पिकविण्यासाठी वापर होऊ लागला. मोटेवरच्या बागायतीनंतर शेतकरी इंजिनवर बागायती शेती करू लागले. अलीकडे सर्रास इलेक्ट्रिकच्या वापरावरच शेती व्यवसाय अवलंबून आहे. लाकडी अवजारांवरून लोखंडी अवजारे आणि आता कृषी यांत्रिकीकरणामुळे आधुनिक अवजारांच्या साहाय्याने शेती केली जात आहे. तसेच परिसरात पावसाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकरी नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. दोडी येथील कचवेश्वर गणपत आव्हाड व सखाराम गणपत आव्हाड यांनी एक वर्षापूर्वी १२ हजार रोपांची दीड एकरावर सरी वरंबा पद्धतीने लागवड केली होती. याची पहिली कापणी साडेतीन महिन्यांनी करून एकरी १० किलो तेल काढून १२ हजार ५०० रुपये भावाने मुंबईच्या सुगंधी तेलाची निर्मिती करणाऱ्या कंपनीला विकले. यापासून त्यांना पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. त्यानंतर अडीच महिन्यांत दुसरी कापणी सुरू आहे. दुसऱ्या कापणीला तेलाचे प्रमाण दुपटीने वाढले असल्याने त्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. दुसऱ्या कापणीला जिरेनिअमपासून तेलाचा उतारा प्रतिटन दीड किलोपर्यंत मिळाला आहे. जिरेनिअम या पिकापासून त्यांना वार्षिक एकरी साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती व्यवसाय सोडून आधुनिक शेती करण्याची गरज असल्याचे आव्हाड कुटुंबीयांनी सांगितले.
कोट... वारंवार बदलत्या हवामानामुळे शेतपिकांचे नेहमीच नुकसान होत असते. त्यातच उत्पादित मालाला बाजारात भाव मिळेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळानुसार बदलून अत्याधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. - कचरेश्वर व गणपत आव्हाड, प्रयोगशील शेतकरी
फोटो - २९ सिन्नर जिरेनिअम
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे पिकविण्यात आलेली जिरेनिअमची शेती.
290721\5403431929nsk_33_29072021_13.jpg
फोटो - २९ सिन्नर जिरेनियम सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे पिकवण्यात आलेली जिरेनिअमची शेती