त्र्यंबकेश्वर देवस्थानासह व्यावसायिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:08 PM2020-07-27T21:08:59+5:302020-07-28T00:34:04+5:30
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजाविधी व ब्रह्मगिरी फेरीला श्रावण महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोनामुळे देवस्थान बंद असल्याने शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे. परिणामी श्रावणात देवस्थान ट्रस्टसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजाविधी व ब्रह्मगिरी फेरीला श्रावण महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोनामुळे देवस्थान बंद असल्याने शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे. परिणामी श्रावणात देवस्थान ट्रस्टसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
कोरोनामुळे शहरात गर्दी हाऊ नये, भाविकांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने त्र्यंबक देवस्थान चार महिन्यांपासून बंद केले आहे. येथे येणाऱ्या बसेस, खासगी वाहने बंद केली आहेत. रस्त्याच्या सीमा ठिकठिकाणी सील केल्या आहेत. ब्रह्मगिरी फेरीही रद्द करून फेरीमार्गावरील पेगलवाडी, पहिणे, गौतमऋषी, सापगाव आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अशा बंद काळात श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी भाविकांअभावी त्र्यंबकनगरीत शुकशुकाट दिसून आला.
-----------------
श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार म्हणजे भाविकांना जणू एक प्रकारची पर्वणीच असते. त्र्यंबकेश्वरनगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जायची. एरव्ही मंदिरात प्रत्यक्ष प्रवेश केल्यानंतर ब्रह्मवृंदांच्या विविध धार्मिक विधींचे मंत्रघोष, मंदिरातील धूपदीप-अगरबत्ती, कपाळाला लावलेला विशिष्ट सुवासाचा अष्टगंध, श्रावणात हमखास आलेली सोनचाफ्याची फुले एक वेगळेच पावित्र्य निर्माण करते. मात्र यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे शहरासह परिसर ओस पडला आहे.
एरव्ही पहिल्या सोमवारी जिल्ह्यासह अन्य भागातून पंचवीस हजारांहून अधिक भाविक त्र्यंबकमध्ये दाखल व्हायचे. हा आकडा तिसºया सोमवारी अडीच तीन लाखांपर्यंत पोहोचायचा. त्यात श्रावणातील पूजाविधी आणि भाद्रपदातील श्राद्धविधी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असायचे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टला एक कोटीपर्यंत उत्पन्नाचा लाभ व्हायचा. तसेच पुरोहितवर्ग, पूजा साहित्य, प्रसाद, किराणा व खासगी वाहनचालक आदी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आठ ते नऊ कोटीपर्यंत उलाढाल व्हायची. ती कोरोनामुळे देवस्थान बंद असल्याने ठप्प झाल्याचे बोलले जात आहे.
-----------------
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनानेच देवस्थान बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने परिसर ओस पडला आहे. मंदिरावर संपूर्ण गावाचे अर्थचक्र अवलंबून असते. वास्तविक श्रावण महिन्यात देवाची पूजा
केल्याशिवाय व फुले वाहिल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. दि. ३१ जुलैनंतर कडक नियमावली घालून तसेच फिजिकल डिस्टन्सिंग राखून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी.
- गिरीश जोशी
पुरोहित, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर
त्र्यंबक नगर परिषदेच्या गाळ्यांमध्ये प्रसादी वाणाचे दुकान आहे. आमचा व्यवसाय येणाºया यात्रेकरूंवर अवलंबून असतो. जेवढी जास्त गर्दी तेवढा जास्त व्यवसाय होत असतो. मात्र चार महिन्यांपासून दुकान बंद असल्याने हजारो रु पयांचे उत्पन्न बुडाले. श्रावण महिन्यात त्र्यंबकला येण्यास बंदी असल्याने मोठे नुकसान झाले असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
- नारायण सोनवणे
प्रसाद व्यावसायिक