दोन कोटींच्या वर नफा : गाळ्यांची अनामत रक्कम जमा सटाणा बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:44 AM2018-02-09T00:44:19+5:302018-02-09T00:44:43+5:30
सटाणा : येथील बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरअखेर दोन कोटी ७७ लाख ७३ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले.
सटाणा : येथील बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरअखेर दोन कोटी ७७ लाख ७३ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले असून, अनावश्यक खर्चाला मूठमाती देऊन एक कोटी ३९ लाख ९४ हजार शिल्लक असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती रमेश देवरे यांनी दिली. दरम्यान, बाजार समितीच्या मालकीच्या भाडेपट्ट्यावर वाटप करण्यात आलेल्या गाळ्यांची अनामत रक्कम सुमारे तीन कोटी रु पये जमा झाल्याचेही सभापती देवरे यांनी स्पष्ट केले. येथील बाजार समितीत गेल्या दीड वर्षात विविध सुधारणा करून बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाजार समिती प्रशासनाने आवारातील कांदा भरलेल्या वाहनांचे लिलाव एका दिवसात होत नसल्यामुळे देवळा रस्त्याला स्वतंत्र कांदा बाजार सुरू केला. या निर्णयामुळे एका दिवसात साडेचारशे ते पाचशे वाहनांचा होणारा लिलाव हजार वाहनांपर्यंत गेला. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.