शासनाने मागविला कामांचा प्रगती अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:28 AM2019-01-30T01:28:14+5:302019-01-30T01:28:31+5:30
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिकेकडून मागविल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
नाशिक : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिकेकडून मागविल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
केंद्र शासनाकडून नाशिक शहराची स्मार्ट सिटीत निवड केल्यानंतर केंद्र, राज्य व महापालिका यांच्या संयुक्त निधीतून शहराला स्मार्ट बनविण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून केले जात असून, गेल्या दोन वर्षांत शहरात फारशी कामे झालेली नसली तरी पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली आहे. काही कामे वादात अडकली असून, अजूनही गोदा प्रकल्पासह काही कामांमुळे शहराचे रूप पालटले जाण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे विकासकामे सुरू असताना प्रत्यक्ष स्थिती काय हे समजावून घेण्यासाठी केंद्राच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने महापालिकेकडून ५० मुद्द्यांवर माहिती मागविली आहे.
शहरातून व्हॅट, सेल टॅक्स किती मिळाला, घरपट्टी-पाणीपट्टीतून मिळणारा महसूल, शहरातील कच्चे-पक्के रस्ते किती किलोमीटर आहेत. कचरा संकलनाची स्थिती व यातून मिळणारे उत्पन्न, पाणीपुरवठा स्थिती-प्रति माणसी होणारा पाणीपुरवठा, उद्यानाची संख्या, शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी, शहरातील रोजगार व बेरोजगारांची स्थिती, वाहनांची संख्या, दररोज लागणारी वीज आदींसह इतर शासकीय विभागांशी संबंधित माहिती मागविण्यात आली आहे.