जेलरोडच्या एका हॉटेलमधून प्रतिबंधित मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:38 PM2020-09-02T16:38:23+5:302020-09-02T16:39:04+5:30
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील या हॉटेलमधून सर्रासपणे प्रतिबंधित मद्याची विक्री केली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती आयुक्तालयाच्या अवैध धंदेविरोधी पथकाला मिळाली.
नाशिक : केंद्रशासित प्रदेशात निर्मित व राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला मद्यसाठा नारायणबापूनगरजवळील खर्जुळ मळा येथील राजगड कॅफे नावाच्या एका हॉटेलमध्ये दडवून ठेवल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंदेविरोधी पथकाला मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा टाकत सुमारे ६ लाख ११ हजार ६३७ रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील या हॉटेलमधून सर्रासपणे प्रतिबंधित मद्याची विक्री केली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती आयुक्तालयाच्या अवैध धंदेविरोधी पथकाला मिळाली. यानुसार सहायक निरीक्षक कुंदन सोनोने, श्रीराम शिंदे, संजय राजोळे, चंद्रकांत काळे, योगेश बिन्नर आदींच्या पथकाने हॉटेल गाठून त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी घटनास्थळावरून संशयित भगवान दामदास गाढवे (३३,रा. सुभाष रोड), धनंजय शिवाजी सूर्यवंशी (२७,रा. शिंदे गाव), शरद सुभाष सानप (३१,रा. चिंचोली गाव) यांना ताब्यात घेतले. यावेळी हॉटेलची झडती घेतली असता पोलिसांना २९ हजार ५६०रुपयांची रोकड, ३ मोबाइल, २९८देशी दारूच्या बाटल्या, टॅँगो पंच दारूच्या २४९बाटल्या यासह बिअरच्या १५ बाटल्या, ब्लॅक व्हिस्क ीच्या ६८ बाटल्या,आॅफिसर ब्ल्यूच्या ८० बाटल्या आदी असा एकूण ६ लाखांचा मद्यसाठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.