नहार यांच्याविरुद्धच्या कटाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:43 AM2018-03-24T00:43:23+5:302018-03-24T00:43:23+5:30
सरहद्द संस्थेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्या नावाने पार्सल पाठवून त्यांना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय नामदेव ब्रिगेड आणि महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देऊन केली आहे.
नाशिक : सरहद्द संस्थेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्या नावाने पार्सल पाठवून त्यांना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय नामदेव ब्रिगेड आणि महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देऊन केली आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सदर निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, नहार यांच्या नावाने पार्सल पाठवून बॉम्बस्फोट घडवून त्यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. परंतु, नगर येथे कुरिअर कार्यालयातच पार्सलचा स्फोट होऊन सदर कट उघडकीस आला. या कटामागे असलेल्या मुख्य सूत्रधाराचा तातडीने शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा द्यावी. संजय नहार यांना देश विघातक शक्तींकडून जिवाला धोका असल्याने त्यांना कायमस्वरूपी शासकीय संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी अशोक सोनवणे, वर्षा खांबेकर, अरविंद क्षीरसागर, सत्यम खंडाळे, नामदेव ब्रिगेडचे प्रवीण पवार, दत्ता बावधने, रमेश चांडोले, योगेश वारे, नारायण खांबेकर, सुधाकर टिभे उपस्थित होते.