गावठाणातील फोडकामांना मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 01:35 AM2021-07-17T01:35:30+5:302021-07-17T01:35:47+5:30

गावठाण विकासाच्या नावाखाली मध्य नाशकातील रस्ते फोडण्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच त्याची सराफ बाजारातील पूर प्रश्न सोडवण्यासाठी दहीपूल (नेहरू चौक) परिसरातील रस्ते तब्बल पाच फूट खोल करण्यात येत आहे. अशाप्रकारचे स्मार्ट डिझाइन बघून महापालिकेचे आयुक्त कैलास जाधवदेखील अचंबित झाले असून, त्यांनी सर्व कामे ताबडतोब थांबविण्याचे आदेश शुक्रवारी (दि. १५) दिले आहेत.

Prohibition of fodder work in the village | गावठाणातील फोडकामांना मनाई

गावठाणातील फोडकामांना मनाई

googlenewsNext
ठळक मुद्देपुराच्या भीतीने धास्तावले : गावठाणातील रस्त्यांचे फोडकाम बघून आयुक्तही अचंबित

नाशिक : गावठाण विकासाच्या नावाखाली मध्य नाशकातील रस्ते फोडण्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच त्याची सराफ बाजारातील पूर प्रश्न सोडवण्यासाठी दहीपूल (नेहरू चौक) परिसरातील रस्ते तब्बल पाच फूट खोल करण्यात येत आहे. अशाप्रकारचे स्मार्ट डिझाइन बघून महापालिकेचे आयुक्त कैलास जाधवदेखील अचंबित झाले असून, त्यांनी सर्व कामे ताबडतोब थांबविण्याचे आदेश शुक्रवारी (दि. १५) दिले आहेत.

सोमवारी (दि. १९) आयुक्त स्वत: ही तांत्रिक बाजू तपासणार असून, त्यानंतरच पुढील कामे करण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आली आहे. गावठाणातील विकासच्या पावणेदाेनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. रस्ते फोडून गटारी टाकतानाच भविष्यातील धोके न ओळखता काम सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असून, त्यातच रस्त्यांची खोली वाढवण्याचा तसेच रस्त्यांचे नाले तयार करण्याचा अजब प्रकार सुरू आहे. त्यामुळे या भागातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि स्मार्ट सिटीचे संचालक शाहू खैरे यांनी आयुक्तांकडे तक्रार करून आधी सर्व कामांची पाहणी करावी मगच पुढील कामे करू द्यावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त कैलास जाधव यांनी शुक्रवारी (दि. १६) पहाणी केली. खोदकामामुळे मेनरोड, दहीपूल भागात गोंधळाचे वातावरण असून, नागरिकांना चालताही येत नाही त्यातच सराफ बाजारातील पुराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दहीपूल भागातील रस्ते पाच फूट खोल करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे सराफ बाजारातील पाणी अन्य भागात शिरून या भागात पुराचा धोका वाढणार आहे. नियोजनशून्य आणि अशा प्रकारच्या कामकाजामुळे आयुक्तांनी स्मार्ट अधिकाऱ्यांना जाब विचारला. या भागातील स्थानिक नगरसेवक, परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी येथेच तक्रारी केल्याने गावठाणातील रस्त्यांचा आराखडाच बदलण्याचे निर्देश आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी शाहू खैरे, गजानन शेलार, वत्सला खैरे, ॲड. वैशाली भोसले तसेच महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे, स्मार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आदी अधिकारी या दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी रस्त्याची अर्धवट खोदकामे करून आता रविवार पेठ ते आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड हे चांगले रस्ते फोडण्यास शाहू खैरे यांनी विरोध केला आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी वत्सला खैरे यांनीही गावठाण भागातील वाहतूक कोंडीविषयी तक्रारी केल्या. आयुक्त कैलास जाधव यांनी रस्त्यांच्या डिझाइनमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

 

इन्फो..

नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस

गावठाण भागातील नागरिकांनीदेखील आयुक्तांकडे स्मार्ट सिटीच्या कारभारावर तक्रारींचा पाऊस पाडला. आधीच कोरोनामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत. त्यात खोदकामामुळे बाजारपेठ ठप्प झाल्याची तक्रार नागरिकांनी केली.

Web Title: Prohibition of fodder work in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.