अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:22+5:302021-05-24T04:13:22+5:30

नाशिक : कोरोनामुळे यावर्षी दहावी व बारावी बोर्डाची लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही. एकीकडे ही परीक्षा कधी हाेणार, की ...

Prohibition on implementation of 11th admission process | अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यास मज्जाव

अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यास मज्जाव

Next

नाशिक : कोरोनामुळे यावर्षी दहावी व बारावी बोर्डाची लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही. एकीकडे ही परीक्षा कधी हाेणार, की होणारच नाही, अशी संभ्रमावस्था असताना दुसरीकडे मात्र काही उच्च माध्यमिक विद्यालये तसेच कनिष्ठ महाविद्यालयांकडून त्यांच्या स्तरावर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जात असल्याचे स्पष्ट करीत शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी अशाप्रकारे अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यास संबंधित संस्थांना मज्जाव केला आहे. यासंदर्भात विभागीय उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना अशाप्रकारे प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार नाही, याविषयी खबरदारी घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

राज्यात नाशिकसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद व अमरावती या महापालिका क्षेत्रांत अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने केले जातात. राज्याच्या उर्वरित क्षेत्रात स्थानिक पातळीवरून प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. मात्र राज्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही. असे असताना काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी २०२१-२२ साठी अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी गुगल फार्मसारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करीत अर्ज मागविणे सुरू केल्याचे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनात आले आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रक काढून कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्रवेशप्रक्रिया सुरू करू नये तसेच पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल होईल अशा प्रकारच्या सूचना दिल्या जाऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना केल्या आहेत.

Web Title: Prohibition on implementation of 11th admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.