त्र्यंबकेश्वर मंदिरात नारळ, फुले, प्रसाद नेण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 12:08 AM2022-02-15T00:08:38+5:302022-02-15T00:08:38+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकराजाच्या दर्शनाला येताना हार, फुले, नारळ या वस्तूंना मंदिरात नेण्यास यापुढे बंदी करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाबाबत ट्रस्टच्या निर्णयानंतर आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात भाविकांना पूजा साहित्याला मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकराजाच्या दर्शनाला येताना हार, फुले, नारळ या वस्तूंना मंदिरात नेण्यास यापुढे बंदी करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाबाबत ट्रस्टच्या निर्णयानंतर आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात भाविकांना पूजा साहित्याला मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात कोरोनामुळे पुजारीवगळता अन्य भाविकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबत साधू-महंत आक्रमक झाले असतानाच आता मंदिरात फुले, नारळ, प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली आहे. कोरोना काळात जवळपास दीड वर्ष मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद होते. कोरोनाचा प्रभाव कमी होताच दरवाजे उघडले जाताच मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्र्यंबकेश्वर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मात्र त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जातांना सोबत फुले, नारळ, प्रसाद घेऊन जाण्यास ट्रस्टने मनाई केली आहे.
फुले, नारळ, प्रसादाला बंदी करण्यामागे कोरोनाचे सुरक्षा नियम असल्याचे कारण देवस्थान ट्रस्ट सांगत आहे. मात्र इतर सर्व सुरक्षेचे नियम तोडले जात असतांना केवळ फुलांना बंदी केली जात असल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. देवस्थान ट्रस्ट मंदिर प्रांगणाच्या प्रवेशद्वारातून आत जाताच भाविकांच्या हातात असलेली फुलांची परडी काढून घेतली जात आहे. दरम्यान प्रवेशद्वारात असलेली धातू शोधक सुरक्षा चौकट मात्र बंद आहे, ती यंत्रणा दुरुस्त करुन भाविकांना सुरळीत प्रवेश दिला जावा अशी मागणी केली जात आहे.
देवाच्या दर्शनाला हजारो किलोमीटर अंतरावरुन आलेला भाविक काही तास दर्शनासाठी रांगेत प्रतीक्षा करतो. काही भाविक दोनशे रूपयांची पावती देतात व नंतर केवळ गर्भगृहाच्या चौकटीपाशी उभे राहून हात जोडत काही सेकंदात तेथून निघून जात असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. तीर्थस्थळ परिसरातील अर्थव्यवस्था, रोजगार नारळ, फुले, प्रसाद यावर अवलंबून असते. नेमकी त्यांनाच बंदी घातल्याने छोटे व्यावसायिक मात्र धास्तावले आहेत.