पंचवटी एक्स्प्रेसची साखळी ओढून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:47 AM2019-06-11T01:47:20+5:302019-06-11T01:47:52+5:30
पंचवटी एक्सप्रेसचे दोन डबे नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश असतानाही मनमाड येथूनच दोन्ही डब्यांमध्ये प्रवासी बसून आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच होऊ शकली नाही.
नाशिकरोड : पंचवटी एक्सप्रेसचे दोन डबे नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश असतानाही मनमाड येथूनच दोन्ही डब्यांमध्ये प्रवासी बसून आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच होऊ शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तीनदा साखळी ओढून निषेध नोंदविला. या घटनेमुळे मात्र पंचवटी एक्स्प्रेस ४५ मिनिटे उशिराने मुंबईला पोहोचली.
मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचे सर्वसामान्य चार कोच नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी खोलले जातात. सोमवारी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी पंचवटी एक्स्प्रेसचे नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आगमन झाले. नाशिकरोड रेल्वे स्थानकासाठी आरक्षित असलेल्या सर्वसामान्य चार कोच पैकी दोन कोच अगोदरच उघडलेले असल्याने त्यामध्ये प्रवासी बसून आले होते.
त्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांना नेहमीच्या डब्यामध्ये बसण्यासाठी जागाच नव्हती. सकाळी ७.१५ वाजता पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पाणी भरून झाल्यानंतर गाडी सुरू होताच नाशिकरोडचे राखीव डबे अगोदरच उघडलेले असल्याने रेल्वे प्रशासनाचा निषेध करत संतप्त प्रवाशांनी साखळी ओढून तीनवेळा गाडी थांबवली. संतप्त झालेल्या प्रवाशांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित नव्हते. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी व रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेऊन वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन देत प्रवाशांची समजुत काढल्याने यामुळे तब्बल ४५ मिनीटे उशिराने ७.४५ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पंचवटी पुढे मार्गस्थ झाली. देवळाली रेल्वेस्थानकात महिला वर्गाच्या डब्यामध्ये पुन्हा साखळी ओढण्यात आली. त्यामुळे पंचवटी पाठोपाठ मुंबईला जाणारी सेवाग्राम एक्स्प्रेस अडकून पडली होती.
पंचवटी एक्स्प्रेसचा पाठीमागील एक कोच गेल्या १५ दिवसांपासून काढण्यात आल्याने इतर कोचवर प्रवाशांचा भार वाढला आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळेबाबत व विविध अडचणीबाबत स्थानिक रेल्वे अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
- राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती