प्रोजेक्ट गोदा : झुलते पूल उभारण्याची फरांदे यांची सूचना गोदापात्रातील पूरप्रभाव कमी करण्यासाठी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:15 AM2018-02-11T01:15:30+5:302018-02-11T01:15:58+5:30
नाशिक : गोदावरी तसेच नासर्डी नदीपात्रातील पूरप्रभाव कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत ‘प्रोजेक्ट गोदा’मध्ये विविध उपाययोजनांचा समावेश आहे.
नाशिक : गोदावरी तसेच नासर्डी नदीपात्रातील पूरप्रभाव कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत ‘प्रोजेक्ट गोदा’मध्ये विविध उपाययोजनांचा समावेश असून, त्याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी नाशिक महापालिकेला दिल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, पूरप्रभाव कमी करण्यासाठी पात्रात सबमर्सिबल पुलांऐवजी हृषिकेश व हरिद्वारच्या धर्तीवर झुलते पूल उभारण्याची सूचना फरांदे यांनी केली आहे. गुरुवारी (दि.८) प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांच्या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी आमदार फरांदे यांनी गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रातील पूरप्रभाव कमी करण्यासंबंधी चर्चा केली. २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर केंद्रीय जल आणि अनुसंधान केंद्राने पूररेषेसंबंधीचा अहवाल सादर केला होता. परंतु, त्यावर २०१२ पासून काहीही कार्यवाही झालेली नव्हती. दरम्यान, महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ‘प्रोजेक्ट गोदा’च्या माध्यमातून पूरप्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने १४७ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदाही काढल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने, आमदार फरांदे यांनी सुचविल्याप्रमाणे होळकर पुलाच्या खाली मेकॅनिकल अथवा बलून गेट बसविण्यात येणार आहेत. याशिवाय, गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणही हटविण्यात येणार आहे. आनंदवलीचा बंधारा आता निरुपयोगी झाल्याने तो हटविण्यात येणार आहे तसेच नासर्डी नदीवरीलही बंधारा काढण्यात येणार आहे. संभाजी चौकाजवळील उंटवाडी पूलही पाण्याला अडथळा ठरत असल्याने तो हटविण्यासंबंधी पाटबंधारे विभागाला महिनाभरात अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नदीपात्र उथळ होत चालल्याने सबमर्सिबल पुलांऐवजी झुलते पूल उभारण्याची सूचना फरांदे यांनी केली आहे. त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना परदेशी यांनी दिल्या. आसारामबापू पूल आणि फॉरेस्ट नर्सरीचा पूल यामुळे पाण्याला अडथळा निर्माण होत असतो. त्याबाबतही उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या.