श्रेयवादावरून पोलीस चौकीचे उद््घाटन लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:18 AM2018-03-04T01:18:21+5:302018-03-04T01:18:21+5:30
सिडको : पोलीस चौकीच्या उद््घाटनाच्या वेळी शिवसेनेचे नगरसेवक व सेनेचे माजी पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने अखेरीस पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला.
सिडको : खुटवडनगर परिसरात पोलीस चौकीसाठी राखीव असलेल्या जागेत महापालिकेच्या वतीने हॉकर्स झोन बनविण्याचा घाट संपत नाही तोच शनिवारी पोलीस चौकीच्या उद््घाटनाच्या वेळी शिवसेनेचे नगरसेवक व सेनेचे माजी पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने अखेरीस पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला. परंतु यामुळे पोलीस चौकीचे उद््घाटन मात्र लांबणीवर पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. खुटवडनगर व चुंचाळे शिवारात नवीन विकास आराखड्यात पोलीसस्थानकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी सदरची जागा ही हॉकर्स झोनसाठी आरक्षित असल्याचा फलक लावण्यात आल्याने याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या जागेवर पूर्वीपासूनच स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिवसेनेचे माजी पदाधिकारी सुधाकर जाधव यांनी समर्थ क्रीडामंडळाच्या माध्यमातून पोलीस चौकीसाठी छोटीसी चौकी उभारली आहे. यास म्हसोबा पोलीस चौकी, खुटवडनगर, असा फलकही लावण्यात आला असला तरी अधिकृतरीत्या पोलीस चौकी सुरू झालेली नाही. यानंतर याच जागेवर मनपाने काही दिवसांपूर्वीच सदरची जागा ही हॉकर्स झोनसाठी राखीव असल्याचा फलक लावून येत्या काही दिवसांत याठिकाणी भाजीविक्रेत्यांसाठी जागा दिली जाणार होती. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांची भेट घेत याठिकाणी होऊ घातलेल्या हॉकर्स झोनला विरोध असल्याचे सांगितले. नगरसेवक दातीर यांनी पाठपुरावा केल्याने गेल्या काही महिन्यांपूर्वीच सदरची जागा ही शासनाने पोलीस चौकीसाठी मंजूर केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर दातीर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत याठिकाणची जागा ही पोलीस चौकीसाठी आरक्षित असल्याचे सांगितले. यानंतर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपआयुक्तमाधुरी कांगणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पाहणी केली. शनिवारी (दि.३)पोलीस प्रशासनाचे अधिकारी व शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर, दीपक दातीर, अलका अहिरे, हर्षदा गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद््घाटन होत असतानाच शिवसेनेचे माजी पदाधिकारी व नगरसेवक दिलीप दातीर यांच्यात श्रेयवादावरून शाब्दिक वाद झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला. परंतु या वादामुळे पोलीस चौकीचे उद््घाटन मात्र लांबणीवर पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याठिकाणी राजकारण न आणता लवकरच पोलीस आयुक्तांच्या हस्ते व वरिष्ठ पोलिसांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस चौकीचे उद््घाटन करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.