‘स्मार्ट सिटी’ची नोकरभरती सापडली वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:48 AM2019-06-21T01:48:55+5:302019-06-21T01:49:54+5:30
स्मार्ट सिटीतील टेंडर घोटाळे आणि ठेकेदारांवर मेहेरबानीचे विषय गाजत असल्याने आता नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल वादात सापडले आहेत. कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी थविल यांच्या बदलीचे आश्वासन संचालकांना दिले असतानाच जाता जाता त्यांनी कंपनीत अनेक पदांची भरती सुरू केली आहे. त्यास सभागृह नेता दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला असून, सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
नाशिक : स्मार्ट सिटीतील टेंडर घोटाळे आणि ठेकेदारांवर मेहेरबानीचे विषय गाजत असल्याने आता नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल वादात सापडले आहेत. कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी थविल यांच्या बदलीचे आश्वासन संचालकांना दिले असतानाच जाता जाता त्यांनी कंपनीत अनेक पदांची भरती सुरू केली आहे. त्यास सभागृह नेता दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला असून, सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
अवघ्या एक किलोमीटर स्मार्टरोडसाठी २१ कोटी रुपयांचा खर्च कंपनी करीत असून, अलीकडेच स्काडा वॉटर मीटरसाठी काढलेल्या निविदादेखील वादग्रस्त ठरल्या आहेत. विशिष्ट ठेकेदारांवर मेहरबानी दाखविणे आणि स्मार्ट सिटी संचालकांना अंधारात ठेवणे त्यानंतर माहिती न देणे तसेच दुरुत्तरे करणे असे अनेक आरोप संचालकांनी केले आणि जोपर्यंत थविल यांची बदली होणार नाही तोपर्यंत बैठकीस येणार नाही अशी भूमिका संचालकांनी घेतली. ती अध्यक्ष कुंटे यांनी मान्य केल्यानंतर आता थविल यांच्या जागी अन्य अधिकाऱ्यांचा शोध सुरू असताना त्यांनी अनेक पदांची भरती सुरू केली आहे.
कुंटे यांच्यावरच आरोप
स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे थविल यांच्याविषयी तक्रार करण्यात आल्यानंतरदेखील त्यांनी थविल तसेच गुजर यांच्यावर कारवाई न केल्याने कुंटे हेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी कुंटे यांनाच दिलेल्या निवेदनात केला आहे.