प्रभाग रचनेपूर्वीच स्वयंघोषितांचा प्रचार
By admin | Published: September 28, 2016 11:17 PM2016-09-28T23:17:55+5:302016-09-28T23:18:35+5:30
मनपा निवडणूक : नागरिकांशी संपर्क मोहीम सुरू
संदीप झिरवाळ पंचवटी
महापालिका पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजल्याने पंचवटी परिसरात राहणाऱ्या अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. मनपा निवडणुकीच्या प्रभाग रचनेची व आरक्षणाची वाट न बघताच निवडणूक लढविणाऱ्या काही इच्छुकांनी स्वयंघोषित उमेदवारी जाहीर करताना थेट प्रचारही सुरू केला आहे.
महापालिका निवडणुकीला चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रभाग रचना व आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारीचे सोपस्कार हे त्यानंतरच पार पडतील. त्याच महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक विद्यमान लोकप्रतिनिधींचे पक्षप्रवेश व अन्य राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने सध्या तरी पंचवटीतील काही प्रभागात विद्यमान लोकप्रतिनिधींनी एक पाऊल मागे घेतले आहे.
प्रभाग रचनेची व आरक्षणाची गोपनीय माहिती केव्हाच फुटली असून, इच्छुक उमेदवार प्रभागाच्या चतु:सीमा स्वत:च स्पष्ट करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने असलेल्या प्रभागातील भौगोलिक क्षेत्रातील मतदारांशी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर ज्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची आहे त्या पक्षाच्या आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजविण्यास सुरुवात केली आहे.
निवडणुका जवळ आल्याने अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे भासते. त्यातून अभी नही तो कभी नही असे म्हणत असे इच्छुक पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची तसेच आरक्षण व प्रभाग रचनेची वाट न बघताच स्वत:च उमेदवारी जाहीर करून निवडणूक प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविणारे इच्छुक सध्या धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधी, दशक्रिया विधी या कार्यक्र मांना हजेरी लावण्याबरोबरच चौकाचौकात फिरून ओळखीच्या नागरिकांना हस्तांदोलन करून वयोवृद्ध दिसल्यास त्यांचे चरणस्पर्श करीत कसे काय चालले आहे याची चौकशी करून छाप पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.