उमेदवारांकडून ‘फोन अ फ्रेण्ड’द्वारे प्रचार जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:52 AM2019-10-16T01:52:25+5:302019-10-16T01:53:41+5:30
निवडणुकीच्या अंतिम पर्वात शक्य ती सर्व माध्यमे वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट उमेदवारांनी ठेवले आहे. त्यामुळे आता लॅँडलाइन तसेच भ्रमणध्वनींवर फोन करून उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवाराचे नाव, चिन्ह सांगून मतदान करण्याची विनंती करीत आहेत. तसेच निकटचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नातेसंबंधातील मतदारांना फोन करण्यास लावत असल्याने निवडणुकीची ही लढाई हातघाईवर आल्याचे अधोरेखित होत आहे.
नाशिक : निवडणुकीच्या अंतिम पर्वात शक्य ती सर्व माध्यमे वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट उमेदवारांनी ठेवले आहे. त्यामुळे आता लॅँडलाइन तसेच भ्रमणध्वनींवर फोन करून उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवाराचे नाव, चिन्ह सांगून मतदान करण्याची विनंती करीत आहेत. तसेच निकटचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नातेसंबंधातील मतदारांना फोन करण्यास लावत असल्याने निवडणुकीची ही लढाई हातघाईवर आल्याचे अधोरेखित होत आहे.
प्रदीर्घ काळ ज्या नातेवाइकांचा आपल्याला कधीही फोन आलेला नसतो अशा नातेवाइकांकडून फोन येण्याचे प्रकारदेखील वाढू लागले आहेत. अमुक अमुक उमेदवार आपल्या तमुक-तमुकचा संबंधातला आहे. कधी काही मदत लागली तर भविष्यात आपल्याला हक्काने त्याच्याकडे जाता येईल. त्यामुळे यावेळी त्यालाच किंवा तिलाच मतदान करा, असेही फोन येण्यास प्रारंभ झाले आहेत. प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांकडून फोनचे हत्यार वापरले जात आहे.
रेकॉर्डेडऐवजी प्रत्यक्ष संवाद
उमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून किंवा प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून गत काही निवडणुकांमध्ये रेकॉर्डेड कॉल येत असत. मात्र, असे बहुतांश रेकॉर्डेड कॉल कट करून टाकले जात असल्याचे अनुभव आल्याने प्रचार यंत्रणेमार्फत आता टेलिकॉलर्सद्वारे फोन केले जात आहेत. संबंधित टेलिकॉलर महिला प्रत्यक्ष मतदाराशी बोलून आपल्या उमेदवाराचे नाव, निशाणी सांगून २१ आॅक्टोबरला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.