उमेदवारांचे प्रचार स्वबळावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:22 AM2019-10-15T01:22:35+5:302019-10-15T01:23:47+5:30
निवडणुका जाहीर झाल्यानंतर अगदी अर्ज भरण्यास प्रारंभ होईपर्यंत युती, आघाडी, वंचित आघाडीने त्यांचे निर्णय प्रारंभी गुलदस्त्यात ठेवून अखेरच्या क्षणी जाहीर केले. मित्रपक्षांबरोबर केलेली युती आणि आघाडीचा गवगवा तर भरपूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात मित्रपक्षाच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची मदत पुरवण्याबाबत युती आणि आघाडीच्या स्तरावरही तटस्थताच दिसून येत असून, उमेदवारांना संपूर्ण यंत्रणा स्वबळावर आणि स्वपक्षीय कार्यकर्त्यांवरच अवलंबून रहावे लागत आहे.
नाशिक : निवडणुका जाहीर झाल्यानंतर अगदी अर्ज भरण्यास प्रारंभ होईपर्यंत युती, आघाडी, वंचित आघाडीने त्यांचे निर्णय प्रारंभी गुलदस्त्यात ठेवून अखेरच्या क्षणी जाहीर केले. मित्रपक्षांबरोबर केलेली युती आणि आघाडीचा गवगवा तर भरपूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात मित्रपक्षाच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची मदत पुरवण्याबाबत युती आणि आघाडीच्या स्तरावरही तटस्थताच दिसून येत असून, उमेदवारांना संपूर्ण यंत्रणा स्वबळावर आणि स्वपक्षीय कार्यकर्त्यांवरच अवलंबून रहावे लागत आहे.
नाशिक महानगरातील चार जागांपैकी तीन जागांवर भाजपचे, तर एका जागी शिवसेनेचा उमेदवार युतीतील आहे. तर आघाडीपैकी राष्टÑवादीचे तीन आणि कॉँग्रेसचा एक उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, त्यातील एकाही उमेदवाराच्या प्रचारार्थ मित्रपक्ष हिरिरीने प्रचारात उतरला असल्याचे चित्र कोणत्याही मतदारसंघात दिसून येत नाही किंबहुना समाजमाध्यमांवर नाराजीचीच चर्चा अधिक प्रमाणात होताना दिसत आहे.
मदत नसली तरी चालेल...
महानगरातील काही मतदारसंघांमध्ये तर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मदत नाही केली तरी चालेल; पण विरोधात काम करू नये एवढीच किमान अपेक्षा उमेदवारांनी ठेवली आहे. आता अखेरच्या दोन-तीन दिवसांत निदान मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपद्रवी होऊ नये, एवढीच उमेदवारांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.