निवडणूक शाखेकडून ईव्हीएम सुरक्षिततेचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:04 AM2019-10-14T01:04:24+5:302019-10-14T01:05:25+5:30
निवडणूक यंत्रणेची जबाबदारी असलेल्या जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या ईव्हीएम विषयीची विश्वासार्हता वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
नाशिक : निवडणूक यंत्रणेची जबाबदारी असलेल्या जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या ईव्हीएम विषयीची विश्वासार्हता वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून ईव्हीएम यंत्रणा किती सक्षम आहे याबाबतची फलकबाजी करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील माहिती अनेकदा पत्रकार परिषदांमधून देण्यात आलेली आहे. लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रात्यक्षिकांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याला ईव्हीएम मशीन्स प्राप्त झाल्यापासून ईव्हीएमची सुरक्षितता कशी जोपासली जात आहे, याबाबत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सध्या निवडणूक शाखेकडून केले जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक शाखा ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतचा टिझर रिलीज करीत आहेत. यामध्ये ईव्हीएमची तांत्रिक माहिती मतदारांना दिली जात आहे. ईव्हीएम किती सुरक्षित आहे याची माहिती देताना ईव्हीएम कोणत्याही यंत्राशी जोडले जात नाही, हॅकिंगला वाव नाही, कोणत्याही प्रकारच्या वायर अथवा वायरलेस यंत्रणेशी ईव्हीएम जोडले जात नाही, ईव्हीएममधील सॉफ्टवेअर एकदाच वापरले जाते, ते पुन्हा वापरता येत नाही अशी अनेक प्रकारची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून दिली जात आहे. यासाठी सोशल मीडियाचा आणि महाविद्यालयीन तरुणांचा वापर केला जात आहे.