लोककला चळवळीला प्रोत्साहन मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:44 AM2017-08-01T00:44:33+5:302017-08-01T00:44:38+5:30
‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकºयांच्या हातावर तरलेली आहे,’ असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे, तद्वतच शाहिरीसह लोककला चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्मारकात सभागृह असावे, विविध उपक्रम राबवावेत, असे मत चळवळीतील कार्यकर्ते व कला अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
नाशिक : ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकºयांच्या हातावर तरलेली आहे,’ असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाशिक शहरात भव्य स्मारक उभारून तेथे त्यांच्या ग्रंथसंपदेचे दालन करावे, तद्वतच शाहिरीसह लोककला चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्मारकात सभागृह असावे, विविध उपक्रम राबवावेत, असे मत चळवळीतील कार्यकर्ते व कला अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. साहित्य, कला, राजकारण आणि समाजसुधारणा अशा चौफेर क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात मुशाफिरी करत वेगवेगळ्या विषयांवर सुमारे पाऊणशे पुस्तके लिहिली. इतकेच नव्हे तर डाव्या विचारसरणीच्या कामगार चळवळीत मोठे योगदान दिले आहे. साहजिकच कंपनी कामगार, रस्त्यावरचा श्रमिक, बांधकाम मजूर, शेतमजूर या सर्वांसाठी अण्णा भाऊ साठे हे प्रेरणास्थान असल्याने त्यांचे नाशिक शहरात उचित स्मारक उभारावे, तसेच या स्मारकात लोकवाङ्मयांच्या अभ्यासासाठी भव्य दालन उभारावे, अशी आग्रही मागणी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे पाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. अण्णा भाऊ साठे स्मृती मंडळाचे अध्यक्ष दशरथ मानवतकर यांनी सांगितले की, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची ओळख नव्या पिढीला व्हावी तसेच त्यांचे विचार व कार्य पोहचविण्यासाठी प्रत्येक शहरातील श्रम वसाहतीत आणि उद्योग वसाहतीत स्मारक उभारावे, अशी मागणी होत आहे. लोककला संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजय पंचरस म्हणाले की, पुणेनजीक बिबडेवाडी येथे अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे आहे, त्यासारखे स्मारक नाशिक, मालेगाव यांसह अन्य शहरांत देखील व्हावे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव आणि मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वास कांबळे, अण्णा भाऊ साठे समाज सेवा फाउंडेशनचे दिनकर लांडगे, मातंग संघर्ष समितीचे संस्थापक अशोक साठे आदींसह अनेक संघटनांच्या पदाधिकाºयांनी अण्णा भाऊ साठे स्मारकाचा प्रश्न शासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.
भारतरत्न पुरस्कारासाठी विविध संघटनांचे आवाहन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातदेखील समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी सतत कार्य केले आहे. सर्वच मागासवर्गाचा विकास व्हावा म्हणून त्यांचे योगदान राहिले. याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र मातंग संघर्ष समिती, मातंग समाज संघटना, बहुजन रयत परिषद, अण्णा भाऊ साठे जागृती संघ, अण्णा भाऊ साठे फाउंडेशन, लहुशक्ती संग्राम परिषद, साठे समाजसेवा फाउंडेशन आदींसह १४ संघटनांनी केली आहे.