सोशल मीडियावर वाढला राजकीय पक्षांचा प्रचार
By admin | Published: February 11, 2017 12:03 AM2017-02-11T00:03:29+5:302017-02-11T00:03:43+5:30
मनपा निवडणूक : ध्वनीफीत, पोस्टरबाजी सुरू
पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांच्या सर्वच उमेदवारांनी आपण आपल्या परिसरात कशा पद्धतीने काम केले आहे किंवा करणार आहे याबाबत ध्वनीफीत तयार करून सोबत पोस्टरबाजी करून सोशल मीडियावर प्रचाराचा वेग वाढविला आहे.
महापालिका पंचवार्षिक निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक असून, यंदा प्रभाग रचना मोठी असल्याने प्रत्येक मतदारांची भेट घेणे शक्य होत नसल्याने उमेदवारांनी सोशल मीडियाला हाताशी धरून फेसबुक, व्हॉट््सअॅप माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. उमेदवाराच्या समर्थनार्थ ज्या त्या उमेदवारांनी आपापल्या परिसरात राहणाऱ्या मतदारांचा, तर कोणी कार्यकर्त्यांचा स्वतंत्र प्रभागनिहाय ग्रुप तयार करून त्यावर दैनंदिन प्रचार केलेल्या ठिकाणांचे फोटो, तर कोण उमेदवार कसा आहे, तो निवडून आला तर काय करणार याबाबतच्या ध्वनीफीत तयार करून निशाणी व उमेदवारांच्या छायाचित्रांचे पोस्टर अपलोड करण्याच्या कामाला मोठी गती दिलेली आहे. पॅनल पद्धत असल्याने सर्वच चारही उमेदवारांचे फोटो असलेले पोस्टर, प्रभाग क्रमांक व पक्ष असा उल्लेख पोस्टरबाजीत असून, सध्या प्रत्येक गु्रपवर तसेच फेसबुकसारख्या सोशल मीडियावर भावी लोकप्रतिनिधींसह सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींचे पोस्टर्स झळकत आहेत. प्रभागात चार उमेदवार असले तरी प्रत्येक उमेदवार हा आपल्या मतदारांना व्हॉटस्अॅपद्वारे मेसेज पाठवित असल्याने एकाच मतदाराच्या मोबाइलवर किमान चारवेळा हा मेसेज फिरत असल्याने त्यांना मोबाइल हॅँग होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.