प्रचाराला उरले अवघे सहा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:01 AM2019-10-14T01:01:07+5:302019-10-14T01:02:57+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणे शक्य नसल्याचे पाहून उमेदवारांनी कार्यकर्त्यांकरवी मतदारांपर्यंत आपले प्रचारसाहित्य पुरविण्यावर भर दिला आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणे शक्य नसल्याचे पाहून उमेदवारांनी कार्यकर्त्यांकरवी मतदारांपर्यंत आपले प्रचारसाहित्य पुरविण्यावर भर दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदरपासून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने मतदारसंघाचा राजकीय व सामाजिक अभ्यास करण्याबरोबरच, ठिकठिकाणच्या समर्थक, हितचिंतकांचे मेळावे, बैठका घेऊन निवडणुकीचा कल जाणून घेतला असला तरी, प्रत्यक्ष नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी वाटपावरून साठमारी सुरू असल्यामुळे जोपर्यंत पक्षाची अधिकृत उमेदवारी हातात पडत नाही, तोपर्यंत उमेदवारीबाबत निश्चितता नव्हती. पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर छाननी व माघारीपर्यंत सर्वच उमेदवारांचा जीव टांगणीला लागून होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या खºया प्रचाराला ७ आॅक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीचे चार दिवस तर उमेदवारांचे विविध भागांमध्ये संपर्क कार्यालये उघडण्यात व कार्यकर्त्यांवर जबाबदारीचे वाटप करण्यात गेले. त्यानंतर मात्र मतदारसंघात नेत्यांच्या प्रचारसभांच्या आयोजनात उमेदवारांचा वेळ खर्ची पडला. निवडणुकीचा प्रचार सुरू होऊन सात दिवस उलटले असून, पहिल्या टप्प्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉँग्रेसने बºयापैकी आघाडी घेतली आहे. त्यांच्या त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रामदास आठवले, छगन भुजबळ, डॉ. अमोल कोल्हे यांचे जिल्ह्यात दौरेही झाले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शरद पवार, राज ठाकरे आदींच्या सभा घेण्याचे घाटत आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसच्या एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा होऊ शकलेली नाही.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांचा कालावधी मिळणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमावरून दिसत असले तरी, २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने मतदानाच्या ४८ तास अगोदर जाहीर प्रचाराला निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. त्यामुळे शनिवार, दि. १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर उमेदवारांना नाईलाजाने प्रचार आटोपता घ्यावा लागणार आहे.