मनसे जुलैतच वाढविणार प्रचाराचा नारळ

By admin | Published: June 22, 2016 11:53 PM2016-06-22T23:53:38+5:302016-06-23T00:02:15+5:30

राज ठाकरेंचा दौरा : गोदापार्कसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Promotional coconut to increase MNS in July | मनसे जुलैतच वाढविणार प्रचाराचा नारळ

मनसे जुलैतच वाढविणार प्रचाराचा नारळ

Next

नाशिक : महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याने सत्ताधारी मनसेने गोदापार्क, बॉटनिकल गार्डनसह विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांचा मेगा इव्हेंट जुलैमध्ये राबविण्याचे निश्चित केले असून, राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ वाढविला जाणार आहे. १५ आणि १६ जुलै रोजी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार असून, याचवेळी गोदापार्क, बॉटनिकल गार्डन यांसह विविध प्रकल्पांच्या लोकार्पणाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांत सत्ताधारी मनसेकडून अपेक्षाभंग झाल्याने खुद्द पक्षातूनही नाराजीचे सूर उमटत असून, आतापर्यंत १२ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे, तर काही पक्षांतराच्या वाटेवर आहेत. शिवसेना-भाजपाकडून सातत्याने मनसेवर टीका होत असतानाच त्यांच्याकडून नगरसेवक फोडण्याचेही प्रकार वाढत असल्याने मनसेत अस्वस्थता आहे. त्यातच आठ महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपल्याने जनतेला कसे सामोरे जायचे, याबाबत कार्यकर्त्यांसह पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. पक्षाचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी कार्यकारिणीत फेरबदल करत प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले, परंतु मनसेबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली मानसिकता बदलण्यात त्यांना यश आलेले नाही. गोदापार्कसह वनौषधी उद्यान, गार्डन सिटी, शहर सुशोभिकरण, इतिहास वस्तुसंग्रहालय याबाबत केवळ घोषणाच होत असल्यानेही विरोधकांकडून मनसेवर टीका होत आलेली आहे. परंतु, आता सत्ताधारी पक्षाने राज ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी गोदापार्कचा पहिला टप्पा पूर्णत्वाला नेला असून, गोदावरीला पाणी येण्याची प्रतीक्षा केली जात आहे. याशिवाय, बॉटनिकल गार्डनचेही काम युद्धपातळीवर केले जात आहे. मुंबई नाका येथील सर्कलचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले असून, विल्होळी ते आडगाव नाकापर्यंत उड्डाणपुलाखालील सुशोभिकरणाचे काम करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.
सदर काम पपया नर्सरीला देण्यात आल्याचे वृत्त आहे. याशिवाय, इतिहास संग्रहालयाचेही उत्तरदायित्व एका खासगी कंपनीने घेतल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा दि. १५ व १६ जुलै रोजी करण्यात येऊन याचवेळी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली. तत्पूर्वी, राज ठाकरे ७ ते ९ जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असून, यावेळी सदर प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Promotional coconut to increase MNS in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.